मुंबई/एनजीएन नेटवर्क
यापुढे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतमालाला २४ तासामध्ये पैसे द्यावे लागणार आहेत. अन्यथा शेतकऱ्यांचेपैसे मिळाले नसल्याची तक्रार आल्यास त्या बाजार समितीवर कारवाई होणार असल्याचा इशारा मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी माल विकल्यावर जवळपास दहा दिवस ते दोन महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बाजार समित्या आणि व्यापाऱ्यांनी नियम पाळले नाहीत तर त्यांना कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांना आता त्यांचे पैसे लवकर परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी येत होत्या. तसेच बेदाण्याचा सौदा करणारे व्यापारी सॅम्पल म्हणून दीड ते दोन किलो बेदाणे घेत असल्याची तक्रार देखील शेतकऱ्यांकडून येत होती. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होत असल्याचं सांगण्यात येत होतं. म्हणूनच आता फक्त 50 ते 100 ग्रॅम बेदाणे सॅम्पल म्हणून घेण्याच्या सूचना देखील बाजार समित्यांना देण्यात आलेल्या आहेत. सॅम्पलच्या नावाखाली बेदाण्यांची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता कारवाई होणार असल्याचं मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई करण्याची मागणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे 31 मार्चपर्यंत ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे. त्यासाठी 550 कोटी रुपये पुरवणी मागणीत मंजूर झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे देखील मंत्री सत्तार यांनी सांगितले.