NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नदीपात्रातून मानवी साखळी करून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेला जातो तेव्हा..

0

त्र्यंबकेश्वर/एनजीएन नेटवर्क

आदिवासी समाजातील दगावलेल्या एका ग्रामस्थाचा मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ आल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खडक-ओहळमध्ये समोर आली आहे.  उद्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना दुसरीकडे आदिवासी समाज आजही मरण यातना भोगतोय, याचे ज्वलंत उदाहरण जिल्ह्यात प्रत्ययास आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खडकओहळ या आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी ओहोळ-नदी पार करून जावे लागते. नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना दिव्या पार करावे लागतात. याच पाड्यावरील एका ग्रामस्थाचे निधन झाले. त्याच्या अंत्यविधीसाठी नदीपार करून जाणे गरजेचे होते. मात्र सध्या पाउस सुरु असल्याने नदीची पाणीपातळी वाढली आहे. नदीला पूल नसल्याने जायचे कसे असा विचार सर्व ग्रामस्थांनी केला. पाणीपातळी अधिक वाढली तर मृतदेह अंत्यविधी न करता पूर ओसरेपर्यंत घरात सांभाळत बसावा लागेल. यासाठी ग्रामस्थांनी नदीपात्रातून मानवी साखळी करून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेला. ग्रामस्थांनी रस्ता, पूल आणि इतर सुविधांबाबत तक्रार केली आहे. तक्रारीचे वारंवार पाठपुरावा सुद्धा केला. मात्र, अर्ज-विनंत्यांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

 ग्रामस्थांना गुजरात राज्यात समावेश हवा

@ खडकओहळजवळ  जांभुळपाडा, विराचा पाडा असे दोन पाडे आहेत. इथल्या ग्रामस्थांना दुसऱ्या पाड्यावर जाण्यासाठी ओहोळ-नदी ओलांडून जावे लागते. अंत्यविधीसाठी, गर्भवती महिलेस दवाखान्यात नेतांना, आजारपणात दवाखान्यात नेतांना तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याच ग्रामस्थांनी सांगितलं. या समस्यांबाबत ग्रामविकास विभागाकडे पत्र दिले. मात्र, अद्यापही इथल्या समस्यांकडे यंत्रणांचे लक्ष गेलेले नाही. गैरसोयीने बेजार ग्रामस्थांनी आमच्या ग्रामपंचायतीचा जवळच्याच गुजरात राज्यात समावेश करावा, अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.