- ‘रिपाइं’, रिपब्लिकन सेना सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्षित; स्वतंत्र चूल मांडल्याचा सत्ताधाऱ्यांना फटका शक्य
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महापालिका निवडणूक प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना या राज्यातील सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये लढली जाण्याची शक्यता असताना शहरातील सुमारे पंधरा जागी दलित-मुस्लीम मते निर्णायक ठरणार आहेत. भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) आणि शिवसेनेने रिपब्लिकन सेना ( आनंदराज आंबेडकर प्रणीत ) यांना तिकीटवाटपात स्थान न दिल्याने हे पक्ष स्वतंत्र लढण्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
निवडणूकपूर्व काळात भाजपने ‘रिपाइं’ आठवले गटाला काही जागा देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार, नाशिकरोड आणि सातपूर परिसरांत काही प्रभागात जागा मिळणे ‘रिपाइं’ ला अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र भाजपने त्या पक्षाला एकही जागा सोडली नाही. भाजपने रिपाइं बाबत जे केले तेच शिवसेनेने रिपब्लिकन सेनेबाबत धोरण ठेवले. दलित मतांचा शहरातील काही भागात निश्चितच प्रभाव आहे. याच पार्शभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने ५३, रिपब्लिकन सेनेने ११ तर रिपाइंने काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. रिपब्लिकन सेनेचे अविनाश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार गट ) चे संजय साबळे, ‘रिपाइं’ आठवले गटाचे प्रकाश लोंढे हे दलित चेहरे यावेळी मैदानात आहेत.
मध्य नाशिक मतदारसंघात मुस्लीम मतांची संख्या लक्षणीय आहे. किमान पाच प्रभागांत मुस्लीम मते निर्णायक ठरतात. भाजप आणि शिवसेना या पक्षांनी मुस्लीम उमेदवार देणे टाळले आहे. सर्वाधिक मुस्लीम मतदार असलेला प्रभाग क्रमांक १४ ‘दुबई प्रभाग’ म्हणून ओळखला जातो. तिथे राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार गट ), कॉंग्रेस आणि शिवसेना ( उबाठा ) पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. या प्रभागात एकूण १८ मुस्लीम उमेदवार नशीब अजमावत आहेत.
लोंढे यांची तुरुंगातून लढत
दरम्यान, गेल्या पाच निवडणुकांत प्रतिनिधित्व राहिलेल्या ‘रिपाइं’ आठवले गटाचे नेते प्रकाश लोंढे हे सध्या विविध गुन्ह्यांतील सहभागामुळे तुरुंगात आहेत. ते यंदा तुरुंगातून लढत देत आहेत. त्यांच्या स्नुषा तथा माजी नगरसेविका दीक्षा लोंढे या प्रक्षा लोंढे यांच्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. सातपूर परिसरात दबदबा असलेल्या लोंढे कुटुंबाला यावेळी मतदार साथ देतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.