NGN News
Latest Marathi News

दादांची एक्झिट अविश्वसनीय, अति वेदनादायी.. मान्यवरांची श्रद्धांजली

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर येत असताना भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. पवार यांच्या धक्कादायक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. नाशिक जिल्हा आणि अजित पवार यांचे एक खास नाते राहिले. अनेकांशी त्यांचा वैयक्तिक स्नेह होता. स्वाभाविकच, त्यांच्या जाण्याचा अनेकांना जबर धक्का बसला. दादांची एक्झिट अविश्वसनीय, अति वेदनादायी आणि एकटेपण आणणारी ठरावी, असह शब्दांत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यान श्रद्धांजली अर्पण केली.

अत्यंत धक्कादायक… छगन भुजबळ

अजितदादांसारख्या धडाडीच्या नेत्याचं असं अचानक जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. त्यांच्यासारख्या उमद्या, सतत हसतमुख आणि जिंदादिल व्यक्तिच्या अकस्मात निधनाची बातमी कधी कानावर येईल, असं मलाच काय, महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला वाटलं नसेल. परंतु दुर्दैवाने हे वास्तव स्वीकारण्याची कठीण वेळ आज आपल्यावर आली आहे. व्यक्तिगत मला स्वतःलाही यातून सावरणं खूप कठीण जाणार आहे. ‘कडक शिस्तीचे प्रशासक’ अशी ओळख असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.  दादांनी मला आणि आमच्या भुजबळ कुटुंबाला दिलेलं प्रेम कायम स्मरणात राहील.

हक्काचा मार्गदर्शक हरपला .. समीर भुजबळ

अजितदादांच्या निधनाची बातमी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यावर सर्वात मोठा आघात आहे. दादा आमच्यासाठी फक्त नेते नव्हते, तर पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक आधार, एक हक्काचा मार्गदर्शक होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! राजकीय स्थित्यंतरे घडत होती, त्या कठीण काळातही दादांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि पक्षाची मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवली होती. दादांचा तो विश्वास खूप मोलाचा होता. प्रशासनावर पोलादी पकड, स्पष्टवक्तेपणा आणि वक्तशीरपणा ही बलस्थाने असणारे अजितदादा, सर्वांसाठीच आदर्श होते. 

राज्याचा आधारवड कोसळला : नरहरी झिरवाळ

राजकारणात अनेक नेते भेटतात, पण आयुष्य घडवणारे, माणूस म्हणून उभं करणारे नेते फारच थोडे असतात. माझ्या राजकीय आणि सामाजिक आयुष्याला दिशा देणारे, प्रत्येक कठीण काळात पाठीशी उभे राहणारे असे नेते म्हणजे अजितदादा पवार. दिंडोरी–पेठ तालुक्याच्या विकासासाठी दादांनी दिलेला आधार शब्दात मांडता येणार नाही. दादा आपल्यातून गेले, पण त्यांनी दिलेला आधार, शिकवण आणि माणुसकी कधीच जाणार नाही. माझ्या दृष्टीने राज्याचा आधारवड काळाच्या पडद्याआड गेला.

परिपक्व नेता हरपला .. प्रेरणा बलकवडे

नाशिकची त्यांची शेवटची भेट माझ्या भगुरच्या सभेसाठी होती.. राज्याचे कुटुंब उपप्रमुख अजित दादा सुखरुप असावेत ही भाबडी आशा. असे कोणतेही मराठी मन नसेल जे अजित दादांच्या आकस्मिक जाण्याने हेलावले नसेल. असे कोणतेही डोळे नसतील जे आज पाणावले नसतील. दादांच्या जाण्याने माझा मार्गदर्शक, एक परिपक्व नेता हरपला.

उमदा राजकीय नेता हरपला .. प्रदीप पेशकर

अजितदादा म्हणजे एक बिनधास्त नेता, कार्यक्षम नेता, हसतमुख राहण्याची कार्यशैली, कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ. प्रशासनावर भक्कम पकड असलेले नेतृत्व आज काळाने हिरावून घेतले. दादांशिवाय महाराष्ट्रातील राजकारणाची कल्पनाच करू शकत नाही. एका अत्यंत उमद्या राजकीय नेत्याला महाराष्ट्र मुकला यांचे अतिव दुःख आहे. अजित दादा पवारांना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली!

समर्पित भावना चिरस्मरणीय .. नितीन ठाकरे

अजितदादांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांची जनतेसाठीची निष्ठावान सेवा, कार्यकर्त्यांशी असलेले आत्मीय नाते आणि लोकांबद्दलची समर्पित भावना कायम स्मरणात राहील. आपल्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी घेतलेले रोखठोक निर्णय आणि दाखवलेले नेतृत्व सदैव स्मरणात राहील. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मराठा विद्या प्रसारक समाज सहभागी आहे.

असा नेता होणे नाही .. दीपिका चव्हाण

अजित दादांनी बागलाण तालुक्याच्या विकासासाठी भरीव काम केले. जनतेच्या प्रश्नांवर अजित दादांनी भरभरून मदत केली. अवघ्या राज्याचे बारकावे ठाऊक असलेला प्रगल्भ नेता म्हणून दादांचा लौकिक होता. राज्यातील प्रत्येक प्रश्नाची त्यांना जाण होती. शहरी असो की ग्रामीण समस्या, तिचा बारकाईने अभ्यास करून तड लावण्याची तळमळ त्यांच्यात होती. असा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही. बागलाणवासीयांची दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments are closed.