डांगसौंदाणे/निलेश गौतम
महाराष्ट्रातील सर्वच लहान मोठे किल्ले भटकंती करणाऱ्या केरळच्या एम .के. हमराज या तरुणाने एक मे 2022 ते आज पर्यंत तब्बल 15 हजार किमी चा सायकल प्रवास करीत सुमारे 265 लहान-मोठे गड किल्ल्यांची भ्रमंती केली आहे. मूळचा केरळ मधील कालिकतचा असलेला हमराज हा छत्रपतींचा इतिहास जाणून प्रभावित झाला आहे. मूळ पेशा ड्रायव्हर असला तरी बी कॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या हमराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवलोकन करीत आपले स्वतःचे नामकरण शिवराज गायकवाड असे केले आहे एक मे 2022 ला महाराष्ट्रातील प्रतापगडापासून आपल्या गडकिल्ले भ्रमंतीला सुरुवात करीत सुमारे 265 किल्ले आज पर्यंत सर केले आहेत. पंधरा हजार किमी चा पल्ला सायकलीवर गाठताना त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील किल्ल्यांची माहिती मिळविली आहे. ते आज बागलांणच्या पश्चिम भागातील डांगसौंदाणे परिसरात असलेल्या भिलाई किल्ल्याच्या भ्रमंतीसाठी आले होते.
याच भागात असलेला सह्याद्री पर्वत रांगेतील राज्यातील सर्वात उंच गिरीदुर्ग म्हणून ओळख असलेल्या साल्हेर ची चढाई शिवराज गायकवाड यांनी या आधीच केली आहे. भिलाई किल्ल्याची भ्रमंती करण्यासाठी आलेल्या गायकवाड यांनी आज सकाळी पहाटेच भिलाई किल्ला सर करीत डांगसौंदाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ येत छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पुढील प्रवास त्यांचा कळवण तालुक्यात असल्याने त्यांचा डांगसौंदाणे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांच्या या गडकिल्ले भ्रमंतीच्या कामाला गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
105 किल्ले भ्रमंती करण्याचे बाकी असून तीन महिन्यात उर्वरित किल्ले भ्रमंती करत रायगडावर राज्याभिषेक दिनी राज्याभिषेक करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला आहे तब्बल 14 महिन्यांपासून शिवराज गायकवाड आपल्या घरून निघाले आहेत छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपल्याला मान सन्मानासह मदत मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आज ते कळवण मधील किल्ले सर करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांचा यावेळी जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला अध्यक्ष सोपान सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ बोरसे, रवींद्र सोनवणे, हॉटेल अंगणचे संचालक प्रकाश पाटील, निवृत्त मुख्याध्यापक साहेबराव काकुळते ,साहेबराव बोरसे, संजय सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, सुनील वाघ मधुकर केल्हे, स्वप्नील चिंचोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते