देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
देशाच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल. मागणी व उत्पादन वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबांच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, अजित चव्हाण, गोविंद बोरसे, ॲड. श्याम बडोदे, स्वाती भामरे, चित्रेश वस्पटे, राहुल कुलकर्णी, पियुष अमृतकर आदी उपस्थित होते.
सरकारकडून विकासाचे राजकारण
राज्यात सरकार कोणाचेही असले तरी जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला, प्रत्येक कुटुंबाला, गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना, लहानमोठ्या उद्योजकांना, प्रत्येक व्यापाऱ्याला आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला लागली आहे. त्यांचे हीन दर्जाचे राजकारण त्यांना लखलाभ होवो, मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत रहाणार असा विश्वासही केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला.
Comments are closed.