NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

जनस्थानच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त नाशिककरांसाठी सांस्कृतिक पर्वणी

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात आधुनिक साधनांच्या उपयोगाने नवीन पर्व सुरु करणाऱ्या ‘जनस्थान’ या व्हाट्सअप ग्रुपचा नववा वर्धापनदिन येत्या १८ ते २४ जून दरम्यान साजरा होत असून महोत्सवाच्या तयारीला वेग आला असल्याची माहिती ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर यांनी दिली.

नाशिक ही सांस्कृतिक भूमी म्हणून ओळखली जाते. पं.विष्णू दिगंबर पलुस्कर, दादासाहेब फाळके, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर, बाबूराव बागूल यांच्यासारखे एक ना अनेक देदीप्यमान तारे नाशिकच्या नभांगणात चमकले. त्यांचीच परंपरा वेगवेगळ्या माध्यमातून पुढे नेणारे कलावंत आजही नाशिकचे नाव भारतीय पातळीवर नेत आहेत. या सगळ्यांचा एकत्रित असणारा ‘जनस्थान’ हा व्हाट्सअप ग्रुप दरवर्षी आपला वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा करतो. यंदाही हा सात दिवस चालणारा उत्सव नाशिकमध्ये साजरा होत असून चित्र – शिल्प प्रदर्शन, आयकॉन पुरस्कार सोहळा, गायन,नृत्य असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.

या सोहळ्यासाठी मान्यवर प्रमुख पाहुणे येणार असून त्यांच्या ज्ञानाचा अनुभव या महोत्सवाद्वारे नाशिककरांना घेता येईल. ग्रुपमध्ये असलेल्या चित्रकार आणि शिल्पकार यांचे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकामध्ये दि. १८ ते २१ असे तीन दिवस भरणार आहे. प्रदर्शनात विविध चित्राकृतीबरोबर शिल्पकार दोन दिवस प्रत्यक्ष शिल्पनिर्मिती करून दाखवणार आहेत. यामुळे नव्या पिढीबरोबरच नवे काही करू इच्छिणार्‍यांना एक वेगळा आनंद मिळेल.

याबरोबरच मराठीतील नामवंत कवींच्या ‘ नातं ‘ या विषयावरील कवितांवर आधारित कवितांचा नाट्यमय आविष्कार दि. २३ ला होईल. त्यात माणसाच्या जीवनात असलेल्या वैविध्यपूर्ण नात्यांचा वेध घेतला जाणार आहे.

हिंदी सिने संगीताने आजवर रसिकांना आपलेसे करून घेतले आहे. त्या सिने संगीतातील शास्त्रीय रागांवर आधारित असलेल्या गाण्यांचे सादरीकरण दिनांक २४ या दिवशी होणार आहे. रागदारीवर आधारित बॉलिवूड मधील क्लासिकल गीत असलेली एका स्वतंत्र मैफलीत ऐकायला मिळण्याची ही दुर्मिळ संधी या महोत्सवात नाशिककरांना उपलब्ध होईल. या कार्यक्रमाने जनस्थान फेस्टिव्हलची सांगता होईल. लवकरच चार जनस्थानियांना आयकॉन पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत. तो सोहळा दि.२२ ला होईल. त्यामुळे या अनोख्या महोत्सवाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.