नाशिक/एनजीएन नेटवर्क
गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढल्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोड वर आले आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करत कामचुकार अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. तर अलीकडे घडलेल्या तीनही गुन्हेगारी घटनांमधील आरोपींना काही तासात अटक केल्याचे स्पष्ट करीत कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. पोलिसांना आव्हान देणाऱ्या या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शहरात सलग तिसऱ्या दिवशी वाहन तोडफोड करत गुन्हेगारांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. नाशिकच्या जेलरोड परिसरात रहदारीच्या ठिकाणी तरुणाची धारदार शस्त्राने हल्ला करून केलेली हत्या, विहितगाव परिसरामध्ये एका सोसायटीत घुसून समाजकंटकांनी सिनेस्टाईल पद्धतीने वाहनांवर पेट्रोल टाकून वाहन जाळपोळ आणि तोडफोड, पुन्हा एकदा नाशिक रोड परिसरात पाच ते सात वाहनांवर समाजकंटकांच्या एका जमावान हल्ला चढवत तोडफोड या घटनांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. ही तोडफोड करत असताना या टोळक्याने हातात तलवारी, कोयते अशी धारदार शस्त्र नाचवत पोलिसांना आव्हान दिल्याने नागरिकांनी या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.