NGN News
Latest Marathi News

गुन्हेविश्व वर्धिष्णू, तरीही सारेच सहिष्णू ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

एनजीएन न्यूज नेटवर्क

काही वर्षांपूर्वी गुन्हेगारीचे आक्राळविक्राळ रूप शब्दांत मांडायचे तर उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचे दाखले दिले जायचे. कालौघात, महाराष्ट्रापुरता हा विषय आला की मुंबई, पुणे आणि लगोलग बीड असे ‘रॅंकिंंग’ ठरवले जायचे. आता नाशिकनेदेखील या नकोशा यादीत स्थान मिळवले आहे. इथल्या गुन्हेविश्वाचे स्वरूप कमालीचे भयानक बनले आहे. कुठे-केव्हाही दिवसाढवळ्या खून पडू शकतात, जणू ही मानसिकता तमाम नाशिककरांनी तयार करून घेतली आहे. चार महिन्यांत चोवीस जणांच्या हत्येचा आलेख नाशिकमधील झुंडशाहीचा ढळढळीत पुरावा आहे. इथली शांती भंग पावली आहे. सटरफटर कारणावून होणाऱ्या वादाचे पर्यावसान एखाद्याला यमसदनी पाठवण्यात होते, हा कोणाच्याही आश्चर्य वा वैचारिक स्तब्धतेचा मुद्दा राहिलेला नाही. पूर्वी, गुन्हेविश्वाशी निगडीत कोणत्याही घटनेचा राजकीय अथवा संघटित गुन्हेगारीशी संबंध जोडला जायचा. त्यामध्ये तथ्य नव्हते, असे अजिबात नाही. आता मात्र, तशी परिस्थिती राहिलेली नसताना भरदिवसा रस्त्यांत, चौकांत, हॉटेल-कॅफेत सपासप कोयते, तलवारी आणि चाकू चालवणाऱ्यांत एवढे मनोबल येते कुठून, हा व्यापक विचाराचा भाग ठरावा.

मानसशास्त्रीयदृष्ट्या गुन्हा हा प्रतिकूल सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक परिणामांचा पाया मानला जातो. नाशिकमध्ये हे बुरूज खरोखर ढासळलेत का, हा कळीचा मुद्दा आहे. गंभीर गुन्हे घडताहेत, ही बाब जितकी सचिंत करणारी आहे, त्याहून बहुसंख्य गुन्ह्यांमधील अल्पवयीनांचा सहभाग ही अतिगंभीर गोष्ट मानायला हवी. मिसरूड न फुटलेल्या, शैक्षणिक आणि सामाजिक अंगांनी परिपक्वता न आलेल्यांना खूनासारखे भयावह प्रकार का करावेसे वाटतात, हा यक्षप्रश्न आहे. ज्या वयात स्वत:च्या भवितव्याची चिंता वाहायला हवी, कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेची स्वप्नं बघून त्यांचा पाठलाग करण्याची महत्वाकांक्षा जागृत व्हायला हवी, सामाजिक प्रतिष्ठेपोटी सुदृढ भवितव्याची पायाभरणी करण्याची आस निर्माण व्हायला हवी, त्या वयात एखाद्याचा मुडदा पाडण्याची हिकमत होणे म्हणजे दूषित विचारांच्या शिंपणाने स्वत:च्या आयुष्याचा चिखल करण्यासम आहे. किरकोळ वाद, पूर्ववैमनस्य, दहशतनिर्मिती यांपैकी कोणत्यातरी हेतूसाठी एखाद्यावर सशस्त्र हल्ला करण्याचे बळ प्राप्त होणे हे खरेतर विकलांग मानसिकतेचे लक्षण आहे. पण बापुड्या तरूणाईच्या हे लक्षात येत नाही, यापेक्षा वेगळे दुर्दैव कोणते असावे?

तरूणाईतील गुन्हे प्रवृत्ती रात्रीतून जन्म घेत नाही. दीर्घकालीन पार्श्वभूमीतून ती आकार घेत असते. कुटुंबातील सदस्यांच्या सजगतेला चकवा देवून या प्रवृत्तीची मुले समविचारींशी हातमिळवणी करून इप्सितप्राप्ती करतात. त्यांना ना स्वकीयांचे, ना समाजव्यवस्थेचे, ना कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या ‘खाकी’चे भय वाटते. नाशिकमध्ये गेल्या अनेक घटनांत अल्पवयीनांचा सहभाग लपून राहिलेला नाही. त्यांनी कितीही मोठा गुन्हा केला तरीदेखील विधीसंघर्षित म्हणून शिक्का मारत त्यांना गंभीर शिक्षेपासून दूर ठेवण्याची अपरिहार्यता कायद्यालादेखील स्विकारावी लागते. तथापि, त्यामुळे केलेल्या गुन्ह्याचे परिमार्जन होत नाही, ना जीव गेलेल्याला परत आणता येत नाही. मुळात अशा तरूणाईच्या कमी वयात व्यसनाधीन होणे, हातात शस्त्राचा साठा उपलब्ध होणे, त्यांना आर्थिक आणि राजकीय पाठबळ मिळणे याच मुद्द्यांकडे पोलीसांनी लक्ष केंद्रित करायला हवे. इतके गुन्हे घडून, निष्पापांचे मुडदे पडून परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चाललीय, हे वास्तव नाशिककरांसाेबतच ‘खाकी’च्या लेखी प्रधानस्थानी यावयास हवे.

केवळ दंडुक्याच्या धाकाने गुन्हेगारी विश्वावर वचक निर्माण करता येणार नाही. उपरोल्लिखित मुद्देधारित त्यांना मिळणाऱ्या पाठबळाचा पोलीसांनी गांभीर्याने विचार करायला हवा. संघटित गुन्हेगारी हा वैयक्तिक धाडसाचा मु्द्दाच असू शकत नाही. याला मिळणारे प्रत्यक्षाप्रत्यक्ष राजकीय पाठबळ दुर्लक्षून चालणार नाही. मग या शक्ती सत्तेतल्या आहेत की विरोधी, ही बाब गौण ठरावी. संघटित गुन्हेविश्वाच्या मास्टरमाईंड्सना, त्याच्या कथित ‘आकां’ना ठेचल्याशिवाय विघातक वृत्तीचा बिमोड होणार नाही. राजकीय प्रभुत्वासाठी गुन्हेगारांना आसरा देणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करण्याची जबाबदारी समाजाची आहे. थोड्याथाडक्या लाभासाठी एखाद्याला नेता, लाेकप्रतिनिधी म्हणून स्विकारण्याची सुदृढ मानसिकता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे सामाजिक अस्थैर्य डळमळित होणार नाही. अनेकदा पोलीस व्यवस्थेला वास्तव माहित असते, मात्र राजकीय दबावापोटी ते कृतीशीलता गमावून बसतात. नाशिकमधील अलीकडील दोन खुनाच्या घटनांत सत्तेतल्या एका पक्षातील दोन माजी नगरसेवकांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभाग आढळून आला. खरेतर हे हिमनगाचे टोक असावे, सखोल तपासांती सत्तेतल्यांसह विरोधकांतील अनेक ‘आका’ स्वार्थासाठी तरूणाईला गुन्हेगारीच्या तप्त भट्टीत लोटण्यास मागेपुढे पाहत नाही, हे सत्य प्रत्ययास येऊ शकते.

सारांशात, अजुनही वेळ गेलेली नाही. खाकीला सद्साद्विवेकी पद्धतीने काम करू द्या. या व्यवस्थेनेही कर्तव्यकठाेरता, नि:पक्षपातीपण आणि ‘वर्दी’शी बांधिलकी या त्रिसुत्रीचा नि:संकोचपणे अवलंब करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांची धिंड काढणे, प्रसारमाध्यमांचे माहितीस्त्रोत बनणे यापलीकडेही आपले कर्तव्य असल्याची भावना वृध्दींगत करण्यावाचून त्यांच्यापुढे तरणोपाय नाही. हरवलेले सामाजिक स्वास्थ्य पुनर्स्थापित केले नाही तर सदोष व्यवस्था म्हणून आरोपी राहतात, त्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ ‘खाकी’वर येईल, यामध्ये शंका नाही, इतकेच.

Comments are closed.