NGN News
Latest Marathi News

नाशिकला हवेय गुन्हेगारी नियंत्रण, कुंभनिधी आणि पुणे रेल्वेमार्गाचे कोंदण

नाशिकमधील तीनही आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहरात गेल्या काही दिवसांपासून जाटील बनलेल्या आणि सरकारला टीकेचे लक्ष्य बनवलेल्या कायदा सुव्यवस्थेसह महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाजपच्या तीनही आमदारांनी मंगळवारी एकत्रितरीत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. या तिघांनी नाशिककरांच्या जीवनमानाशी निगडित कायदा सुव्यवस्था, प्रस्तावित सिंहस्थ कुंभनिधी मंजुरी आणि रखडलेल्या पुणे –नाशिक रेल्वेमार्गाबाबत निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना अवगत केले.

आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांनी मुंबईत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या चार महिन्यात शहर परिसरात चोवीस खून पडले असून कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिसांच्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे. गृह मंत्रालय खुद्द मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असल्याने टीकाकारांचा अप्रत्यक्ष रोख सत्ताधारी पक्षाकडे राहतो. आगामी निवडणुकात हा मुद्दा बनू शकतो. ही बाब लक्षात घेवून आमदारत्रयीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा अधिक बळकट करावी, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा आणि नवीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी केली. दीड वर्षांवर येवून ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेल्याबाबत बैठका आणि तदनुषंगिक चर्चांचे सोपस्कार पार पडले जात असले तरी प्रत्यक्षात कामे सुरु होत नसल्याबाबत शहरवासीय तसेच साधू-महंत यांच्यात खद्खद आहे. निधीची तरतूद नसल्याने विकासकामे दृष्टीपथात येत नसल्याने आगामी आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी तातडीने निधी मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

रेल्वेमार्गामुळे विकासाला चालना..

याव्यतिरिक्त, सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना कराव्या लागणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाला समक्ष पर्याय म्हणून प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेत अडकलेल्या रेल्वेमार्गाबाबत फाफाडीने तोडगा काढण्याची विनंती आमदारांनी केली. हा प्रकल्प मार्गी लागल्यास प्रवासाचा वेळ कमी होऊन उद्योग, शिक्षण आणि व्यापाराला चालना मिळेल, असा मुद्दा यावेळी पुढे करण्यात आला.

@ नाशिक शहरवासीयांच्या भावनांचा आदर करणे हे लोकप्रतिनिधींचे कामच असल्याने त्याअनुषंगाने आम्ही तीनही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांनी सर्व मुद्दे समजून घेत ते प्रशासकीय स्तरावर मार्गी लावण्याचा शब्द दिला. या मुद्द्यांवर नाशिकमध्ये एक बैठक घेतली जावी, या आमच्या विनंतीशी सहमती दर्शवत मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. एकूणच नाशिककरांच्या भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी समस्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

Comments are closed.