धुळे/एनजीएन नेटवर्क
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे इतके सुंदर आहेत, असे अजब विधान आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी एका जाहीर भाषणात केले आहे. एव्हढ्यावर न थांबता मंत्री महोदयांनी गावित उपस्थितांना रोज मासे खाण्याचा सल्ला देताना तुम्ही रोज मासे खाल्ले तर तुमचे डोळेही ऐश्वर्याप्रमाणे सुंदर होतील असाही सल्ला दिला.
एका कार्यक्रमात विजयकुमार गावित सहभागी झाले होते. येथील मासेमारी करणाऱ्यांना साधनसामुग्रीच्या वाटपाचा कार्यक्रमात गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. गावित म्हणाले, ऐश्वर्या राय बंगळुरुमधील समुद्रकिनाऱ्याजवळच्या परिसरात राहायची. रोज मासे खाल्ल्याने तिचे डोळे सुंदर आहेत. तुम्ही सुद्धा रोज मासे खा. कारण रोज मासे खाल्ल्याने त्वचा तजेलदार राहते. त्वचा तजेलदार राहण्यामागील मुख्य कारण म्हणजे यामध्ये तेल असतं. याच तेलाचा डोळ्यांना आणि त्वचेला फार फायदा होतो. गावित यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये वेगळीच कुजबूज सुरु झाली, असे कळते.