शिर्डी/एनजीएन नेटवर्क
राहाता शहरातील एक विवाह सर्वत्र चर्चेत आहे. त्याचे कारण स्मशानभूमीत हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. वधू याच स्मशानभूमीत लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिने त्याच भूमीत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. अंधश्रद्धेला मूठ-माती देत तरुणीने लग्नासाठी स्मशानभूमी निवडल्याने तिचे कौतुकही होत आहे.
जिथे मनुष्याच्या आयुष्याचा शेवट होतो ते ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. त्या जागेत केवळ रडण्याचे सुर ऐकायला मिळतात आणि अंत्यसंस्कार बघायला मिळतात त्याच जागेत म्हणजेच स्मशानभूमीत एका जोडप्याने आपल्या सहजीवनाची सुरूवात केली आहे. स्मशानभूमीत गेल्या वीस वर्षापासून काम करणारे गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानभूमीतच लावला आहे. मनोज जयस्वाल आणी मयुरी गायकवाड असे या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे.
स्मशानजोगी गंगाधर गायकवाड आणि पत्नी गंगुबाई गायकवाड यांना तीन मुली व एक मुलगा असून सर्वात लहान मुलगी मयुरी हिचा विवाह शिर्डी येथील मनोज जयस्वाल यांच्यासोबत ठरला होता. तसंच, हा विवाह अंतरजातीय होता. मयूरी आणि मनोज दोघांचेही शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली व नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. पुढे जाऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांचाही विवाह स्मशानभूमीच्या प्रांगणात संपन्न झाला. मनोज जयस्वाल आणी मयुरी गायकवाड यांच्या विवाहासाठी शहरातील मान्यवरही उपस्थित होते त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नी ममता पिपाडा येदेखील उपस्थित होत्या. दामपत्याने नववधूचे कन्यादान करत मुलीला संसार उपयोगी भांडी भेट दिली आहेत. अंधश्रद्धेला मुठमाती देत पार पडलेला हा विवाह इतरांनाही प्रेरणा देणारा ठरणार आहे.