त्र्यंबकेश्वर/एनजीएन नेटवर्क
तालुक्यातील कळमुस्ते ह्या आदिवासी खेड्यातील भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे या वृद्ध दांपत्याला त्यांच्या भाऊबंदकीतील काही व्यक्तींनी मागील फेब्रुवारी महिन्यात अंधश्रद्धेतून भूताळा- डाकीण ठरवल्याची तक्रार महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक जिल्हा शाखेकडे प्राप्त झाली होती. त्यावेळी पोलिस अधीक्षक नाशिक यांना भेटून, जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम सादर झालेल्या एफआयआरमध्ये लावण्याची मागणी महाराष्ट्र अंनिसने केली होती.
मात्र तेलवडे कुटुंबीयांचा त्रास कमी न झाल्यामुळे आज (दि. १८ ) रोजी हरसूल पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश म्हस्के यांच्या तीन सहकाऱ्यांसह महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके, त्र्यंबकेश्वर शाखेचे कार्याध्यक्ष संजय हरळे ,नाशिक शहर शाखेच्या कार्यकर्त्या विजया गोराणे हे सर्व कळमुस्ते (हरसूल) ह्या आदिवासी गावात पोहोचले. पीडित कुटुंब आणि सामनेवाले यांना समोरासमोर आणून दोन्ही बाजूंकडील म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. यावेळी गावचे सरपंच हिरामण चावरे पोलीस पाटील चिंतामण शिंदे हेही उपस्थित होते.
त्यानंतर महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी डाकिण- भूताळीण या अनिष्ट ,अघोरी प्रथेबद्दल आणि एकूणच आदिवासी भागातील अंधश्रद्धा याबद्दलची कारणमीमांसा स्पष्ट केली. डॉ. गोराणे यांनी काही चमत्कार प्रात्यक्षिके सादर करून लोकांचे प्रबोधन केले. अंनिसच्या इतर कार्यकर्त्यांनी ही येथोचित प्रबोधन केले. पोलीस हवालदार एस.के.ठाकरे,एच.पी.गवळी, पोलिस नाईक आर.बी.गवळी यांनी जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली.
यानंतर डॉ. गोराणे यांनी पीडित कुटुंबाच्या घरातील भात मागविला. तो सर्वांसमोर सेवन केला. जर पिढीत कुटुंब हे जादूटोणा , करणी- भानामती करते तर आम्हालाही त्यांच्या घरातील अन्न सेवन केल्याने त्रास होईल. तरी आम्ही ते स्वेच्छेने सेवन करीत आहोत. आमचा असा विश्वास आहे की, अशा प्रकारचा जादूटोणा, मंत्र, तंत्र, करणी भानामती असे काही नसते. तेव्हा आपणही अशा अवैज्ञानिक,कालबाह्य गोष्टींवर विश्वास ठेवू नये, असे कार्यकर्त्यांनी उपस्थितांना सांगितले आणि सोबत भात खाण्याचे आवाहन केले.
त्यानंतर उपस्थितांपैकी पोलिसांनी आणि काही जणांनी कार्यकर्त्यांसमवेत भात खाल्ला. त्यामुळे वातावरण अतिशय हलकेफुलके झाले. नंतर पीडित कुटुंब आणि सामनेवाले यांना समोरासमोर आणून एकमेकाला साखर भरवण्यास कार्यकर्त्यांनी विनंती केली. त्यांनीही तसे केले. सर्वांनी आनंद व्यक्त केला.