नाशिक/एनजीएन नेटवर्क
कोरोना काळामध्ये मानसिक संतुलन खराब झाल्याने त्यामधून बाहेर येण्यापोटी घेतलेला समुपदेशकाचा आधार विवाहितेच्या अंगलट आला आहे. कारण संबंधित समुपदेशकाने अडचणीत आलेल्या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पाठोपाठ लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल होऊन संशयित समुपदेशकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जोएल जॉन्सन (२६, रा. इंदिरानगर) असे जेरबंद करण्यात आलेल्या समुपदेशकाचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार कोरोना काळात मानसिक स्थैर्याच्या समस्येतून विवाहितेने सोशल मिडीयामार्फत संशयित काउन्सिलरशी संपर्क साधला होता. संशयिताशी कौन्सिंलिंगच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर संशयिताने प्रेमाचे नाटक करीत पीडितेशी स्वतःच्या घरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर गुजरात, केरळ व हैदराबाद येथील वेगवेगळ्या हॉटेल्सवर नेत शारीरिक अत्याचार केला. संशयिताने आपल्याला मारहाण केल्याचेही पीडितेचे म्हणणे आहे. सदर प्रकार जानेवारी २०२१ ते जुलै २०२३ असा अडीच वर्षे सुरु होता. या प्रकाराची विवाहितेच्या पतीला समजल्याने विवाहितेने मुंबई नाका पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.