राहुरी/एनजीएन नेटवर्क
अल्पवयीन मुलींना शिकवणीच्या नावाखाली एका शिक्षिकेने धर्मांतराकडे लोटण्याचा गोरखधंदा हेच तालुक्यातील उंबरे गावात दोन समाजात झालेल्या वादाचे मूळ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका शिक्षिकेने धर्मांतराकडे लोटण्याचा गोरखधंदा सुरू केलेला होता . मुलींना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासोबतच नकार देणाऱ्या मुलींना धमकावले जात होते. एका मुलीने धाडस करुन गुन्हा दाखल केला. त्यानंतर आणखी दोन मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
काही दिवसांपूर्वी उंबरे गावात दोन समाजात वाद झाला होता. आठवी नववीत शिकणाऱ्या लहान मुलींना धर्मांतराच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा धक्कादायक प्रकार सुरु होता. गावातील एक शिक्षिका कोचिंग क्लासेस चालवते. मात्र शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन हिंदू मुलींना इस्लाम कसा चांगला आहे, या धर्मात आलात तर काय फायदे आहेत? याची शिकवणी सुरू होती. धक्कादायक म्हणजे काही मुलींची मुस्लिम तरूणांसोबत ओळख करून देऊन त्यांना प्रेमाच्या जाळयात ओढण्याचाही प्रकार समोर आला आहे. विरोध केला तर फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांचे तोंड बंद केली जात होती. काही मुलींनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
शिक्षकी पेशाला काळिमा …
आरोपी महिलेचं नाव हिना शेख असे आहे, ती गावात ट्यूशन क्लासेस चालवायची. ट्यूशनला येणाऱ्या मुलींना इस्लाम धर्माबाबत माहिती दिली जायची. तसेच मुस्लिम मुलांशी मैत्री करायला भाग पाडायची. बांगड्या घालून शिकवणीला येत जाऊ नका असं मुलींना सांगितले जात होते. रमजानच्या दिवशी ट्यूशनमधल्या काही मुलींचे मुलांसोबत फोटो काढले, त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलींवर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. शेवटी मुलींनी घाबरून हा प्रकार घरी सांगितला.
विखे-पाटलांचा इशारा ..
दरम्यान, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अश्या घटना घडतील तेथील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. तसेच त्यांनी उंबरे गावातील घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.