पुणे/एनजीएन नेटवर्क
राज्यात आतापर्यंत एक लाख ८७ हजार रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुण्यात रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभाग अधिक रुग्णंसख्येच्या भागात सर्वेक्षण करून उपाययोजना करीत आहे.
प्राप्त माहितीनुसार, डोळे येण्याचे सर्वाधिक ३० हजार ५९२ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात १२ हजार १३९, अमरावतीत १० हजार ७१०, पुण्यात १० हजार ५३१ आणि अकोल्यात १० हजार १३२ रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत तीन हजार ५५१ रुग्ण सापडले असून, पुणे महापालिका हद्दीत एक हजार १९५ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णसंख्या एक हजार ३१७ आहे.
अशी असतात लक्षणे :
डोळे लाल होणे
डोळय़ांतून वारंवार पाणी येणे
डोळय़ांना सूज येणे
.. अशी घ्या काळजी :
वैयक्तिक स्वच्छता ठेवणे
वारंवार हात धुणे
डोळय़ांना स्पर्श करणे टाळणे
रुग्णांचे घरातच विलगीकरण
परिसर स्वच्छता ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे