मुंबई/एनजीएन नेटवर्क
केंद्र आणि राज्यातील भाजपप्रणीत सरकारचा भ्रष्ट कारभार, महागाई, बेरोजगारी, या प्रश्नांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या वतीने ३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी जनसंवाद यात्रा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
याअंतर्गत विभागवार यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण, उत्तर महाराष्ट्रात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, मराठवाडय़ात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पश्चिम विदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व पूर्व विदर्भात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे. त्यानंतर कोकणात सर्व नेते एकत्रितपणे दोन दिवस या यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधरणार आहेत. साधारणत: तीन आठवडे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढण्यात येणार आहे. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुका कधीही झाल्या तरी त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असून राज्यात सर्वाधिक जागा काँग्रेसलाच मिळतील, असा दावा नाना पटोले यांनी केला.