मुंबई/एनजीएन नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या तयारीला जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये काँग्रेसला 48 पैकी 21 जागांवर सकारात्मक वातावरण असल्याचा दावा करण्यात आला आहे, यामध्ये विदर्भातल्या 10 जागांवर काँग्रेसची परिस्थिती चांगली असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
दुसरीकडे विदर्भातल्या 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचीही नजर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निहाय आढावा बैठक पार पडली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विदर्भातील 10 लोकसभा मतदार संघावर चर्चा केली गेली. एनसीपीने बुलढाणा, यवतमाळ- वाशीम,चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, गोंदिया-भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या लोकसभा मतदार संघावर चर्चा केली. एनसीपीने काँग्रेस पक्षाकडील काही लोकसभा मागण्याची तयारी केली आहे, यामध्ये अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वर्धा, रामटेक या जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे मागितल्या जाऊ शकतात.
राष्ट्रवादीकडून देखील आढावा..
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विदर्भातील 10 जागांचा आढावा घेतला आहे, अशी माहिती दिली आहे. एनसीपीच्या कार्यकर्त्यांकडून आग्रहाची मागणी आहे की रामटेक, गडचिरोली, बुलढाणा, अमरावती लोकसभा मतदार संघ एनसीपीने लढवावा. कार्यकर्ताच्या भावना लक्षात ठेवूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा केली जाईल, अशी रणनिती बैठकीत ठरवली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिली आहे.
एकीकडे राष्ट्रवादीकडून विदर्भावर दावा केला जात असताना काँग्रेसनेही इथल्याच 10 जागांवर आमची परिस्थिती चांगली असल्याचे सांगितले आहे. यामध्ये विदर्भातल्या नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, शिर्डी, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि मुंबईतील दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम हे 21 मतदारसंघ काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आहे.