मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना पक्षांतील फुटीनंतर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसने बाह्य सरसावल्या आहेत. या पदासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केले, राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झाल्यानं काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला आहे.
काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्यानंतर काँग्रेसमधून कोणाला संधी मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातच आता उपरोक्त चार नावांची चर्चा सुरु आहे. हायकमांड नेमका कौल कोणाला देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. दुसरीकडे नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत, तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे गटनेते राहणार आहेत, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.