नाशिक/एनजीएन नेटवर्क
कपालेश्वर महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष मंडलेश्वर काळे व कर्मचारी सुनील शिणगान यांनी मुख्य पुजारी हेमंत गाडे यासह इतर ९ गुरव, पुजारी यांच्या विरोधात संस्थांनच्या कामात अडथळा व सीसीटीव्ही कॅमेराच्या कनेक्टींग बॉक्समधील वायरिंगमध्ये छेडछाड केल्याचा प्रकरणी पंंचवटी पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कपालेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या सात विश्वस्तांची नियुक्ती जुलै महिन्यात सहधर्मदाय आयुक्तांनी केली होती. त्यानंतर ११ जुलै ते २७ सप्टेंबर या कालावधीत विश्वस्तांकडून मंदिरात दानपेटी लावण्याचे काम सुरू होते. या दरम्यान गुरवांकडून विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि दमदाटी करत सभामंडपाच्या बाहेर ती दानपेटी आणून ठेवत दानपेटी लावायची नाही, असे सांगत न्यासाच्या कामात अडथळा निर्माण केला होता.
तसेच मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असताना कॅमेराच्या कनेक्टींग बॉक्समधील वायरिंगमध्ये छेडछाड करून नुकसान केले. तसेच मंदिराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला म्हणून अभिजित गाढे, अतुल शेवाळे, अविनाश गाढे, साहेबराव गाडे, चिन्मय गाढे, अनिल भगवान, आदेश भगवान, कपिल भगवान आणि आदिनाथ गाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घटना श्रावण महिन्यात संस्थान कपालेश्वर महादेव मंदिराच्यावतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नवीन विश्वस्त, कर्मचारी आणि काही स्वयंसेवक यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले होते. त्यावेळी गुरव हेमंत गाडे यानी संस्थानची कोणतीही पुर्व परवानगी न घेता व संबंधित व्यक्तींची संस्थानकडून ओळख पटवून न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने संस्थानच्या नावाने बनावट ओळखपत्रे बनवून ती वाटप केली असल्याने गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक बगाडे व पोलीस नाईक वाडेकर अधिक तपास करत आहे.