NGN News
Latest Marathi News

स्वामी विवेकानंद नगरात सभामंडपाचे लोकार्पण; आ. ढिकले यांच्या निधीतून उभारणी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

पंचवटी : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ६ मधील स्वामी विवेकानंद नगर, मखमलाबाद येथील दुर्गामाता मंदिर परिसरात आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपासह विविध विकासकामांचे लोकार्पण भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

दुर्गामाता मंदिराच्या प्रांगणात सभामंडपाची सुविधा उपलब्ध झाल्याने धार्मिक कार्यक्रम, उत्सव, सामाजिक उपक्रम तसेच नागरिकांच्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. परिसरातील सार्वजनिक सुविधांमध्ये या विकासकामामुळे भर पडली असून, त्याचा स्थानिक नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.

लोकार्पणप्रसंगी आमदार ॲड. राहुल ढिकले, नगरसेवक वाळू काकड, प्रमोद पालवे, महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती तथा नगरसेविका चित्रा तांदळे, भाजप पंचवटी विभाग मंडळाचे अध्यक्ष बबनराव ढगे, यावेळी दुर्गा नगर मित्र मंडळाचे पदाधिकारी भूषण अहिरे, भूषण कदम, शिवाजी बर्गे, अमोल घुगे, मनोज अहिरे तसेच ओम दुर्गामाता मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी दुर्गामातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून परिसरातील विविध प्रश्न व विकासकामांबाबत चर्चा केली. स्थानिक नागरिकांनीही कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दसऱ्यानिमित्त रावणदहन
दसऱ्यानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली रावणदहनाची परंपरा यंदाही ओम दुर्गामाता मित्र मंडळाच्या वतीने उत्साहात कायम ठेवण्यात आली. मंडळाच्या वतीने रावणाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. सभामंडपाचे लोकार्पण आणि रावणदहन या दोन्ही कार्यक्रमांमुळे स्वामी विवेकानंद नगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ओम दुर्गामाता मित्र मंडळाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

Comments are closed.