- नाशिकमध्ये उद्योजक-व्यापाऱ्यांशी साधला संवाद
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यात गुंतवणुकीसाठी आता नाशिक हाच खंबीर पर्याय असून उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
नाशिक दौऱ्यावर आले असता व्यापारी व उद्योजकांच्या संवाद मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून रावल बोलत होते. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आ.सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, धान्य किराणा व्यापारी असोसिएशनचे प्रफुल्ल संचेती, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, अजित सुराणा, सतीश कोठारी आदी होते.
आपल्या भाषणात जयकुमार रावल म्हणाले, उद्योगपतींची ताकद मोठी असून त्यांना खंबीर संरक्षण देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होत आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या चांगल्या स्थानावर नाहीत, याबाबत पणनमंत्री रावल यांनी तीव्र शब्दात खंत व्यक्त केली. नाशिक बाजार समितीतर्फे एक टक्का जाचक कर व्यापारी व शेतकऱ्यांवर लादला जातो ही बाब गंभीर असल्याचे प्रफुल्ल संचेती व सुनील केदार यांनी निदर्शनास आणून दिली असता निवडणुका संपल्यानंतर याबाबत कठोर निर्णय घेण्याचे संकेत रावल यांनी दिले. रावल यांनी नाशकात गुंतवणूक आणण्यास तरबेज अशा शब्दात निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांचा गौरव केला. दावोस येथे आयोजित बैठकीस मोठी गुंतवणूक अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केले. रावल यांच्याकडे एफडीआय ( थेट परकीय गुंतवणूक) हे खाते आल्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक येईल असा विश्वास व्यक्त केला. नाशिक बाजार समितीने लावलेला सेस रद्द करावा. ना. रावल यांच्याकडे राज शिष्टाचार हे खाते असल्याचा धागा पकडून कुंभमेळा यशस्वी पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी राजेंद्र अहिरे, वर्धमान लुंकड, सचिन शाह, राजेंद्र वडनेरे, पारस साखला, कैलास पाटील, कैलास आहेर, गोविंद बोरसे, नितीन आव्हाड, विरल ठक्कर आदींसह व्यापारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.