NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा..

0

शिर्डी/एनजीएन नेटवर्क

गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते‌. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल, पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी यावेळी उपस्थित होते.

शासन आपल्या दारी’ अभियानात अहमदनगर जिल्ह्यात २४ लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे‌. यापैकी ३० हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत. असे नमूद करून मुख्यमंत्री श्री शिदे म्हणाले, आजच्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आजपर्यंत शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली आहे‌. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडवणार नाही – फडणवीस

अहमदनगर जिल्ह्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून 24 लाख लाभार्थ्यांपर्यंत शासन पोहचले असून ३ हजार ९०० कोटी रुपयांचा लाभ एकट्या नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळाला आहे. नमो शेतकरी सन्माननिधीत आता शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजारांची मदत मिळत आहे. जिल्ह्यात फक्त एक रूपयात १२ लाख शेतकऱ्यांचा पीक विमा उतरविण्यात आला आहे. राज्यात दुर्दैवाने दुष्काळा आला तर यावेळी सर्वच शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे. त्यामुळे सरकारची मदत , विम्याची मदत असेल या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत शासन पोहोचविणार असून सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना वर्षभर दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे.

साखर कारखान्यांना शासनाच्या धोरणामुळे बळ -पवार

 राज्यातील सहकारी चळवळीला आर्थिक मदत व गती देण्याचे काम केंद्र सरकारच्या धोरणामुळे मिळाले आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा साडेनऊ हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यात साखर कारखान्यांना मोठे बळ मिळाले आहे. साखर कारखान्यांनी आता नुसते साखर उत्पादन न करता इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे. असे ही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

पवार पुढे म्हणाले की, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुंबई-शिर्डी वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिग लवकरच सुरू होणार आहे. नागपूर-शिर्डी तसेच शिर्डी ते भरवीर पर्यंत समृध्दी महामार्गाची वाहतूक ही सुरू झाली आहे. अशा प्रकारे या परिसराचा चौफेर विकास होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.