मुंबई/एनजीएन नेटवर्क
इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह सापडले असले तरी अद्याप अनेकजण बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य सुरूच आहे. दरम्यान, या दुर्घटनेत बचावलेल्या काही मुलांनी त्यांचे आई-वडील गमावले आहेत. अशा अनाथ मुलांचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे. सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याचा निर्णय डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने घेतला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवरून दिलीय.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत. शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे.