NGN News
Latest Marathi News

एबी फॉर्म्स प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; चौकशीचे निर्देश

  • सुरेखा नेरकर, भाग्यश्री ढोमसे, पुष्पलता पवार, मुकेश शहाणे यांच्या उमेदवारीवर संक्रांत

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक महापालिका निवडणुकीत नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका थेट उमेदवारांनाही बसल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील टोकाच्या गटबाजीमुळे तब्बल चार अधिकृत उमेदवार अडचणीत आले आहेत. पक्षाचे एकऐवजी दोन एबी फॉर्म्स सदर झाले. नियमानुसार, प्रथम अर्ज आलेल्यांची उमेदवारी ग्राह्य धरण्यात आली. परिणामी, पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावावर संक्रांत आली. नाशिकमधील या घटनेने भाजपची प्रतिमा डागाळली गेली असून थेट मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, या घोळावरून नवीन नाशिकमधील पक्षाच्या दोन गटात ब्लेम गेम सुरु झाला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एबी फॉर्म्सची पळवापळवी, भाजप शहराध्याक्षांच्या वाहनाचा पाठलाग आणि फार्म हाउसवर कार्यकर्त्यांचा धुडगूस घालण्याच्या प्रकाराने शहरभर पक्षाच्या शिस्तीचे धिंडवडे निघाले होते. धक्कादायक बाब म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रकार नाकारला असताना भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी त्याची कबुली दिली होती. बुधवारी छाननी प्रक्रियेमध्ये पक्षातील घोळ समोर आला आणि चक्क चार उमेदवारांचे एबी फॉर्म्स बाद करण्यात आले. नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २८ आणि २९ या प्रभागांत पक्षाचे दोन एबी फॉर्म्स आढळून आल्याने खळबळ उडाली. याप्रसंगी वाद निर्माण झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रथम अर्ज सादर केलेला पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जाईल, अशी भूमिका घेतली.

यांच्या उमेदवारीवर संक्रांत..

त्यानुसार, प्रभाग २४ मध्ये सुरेखा नेरकर, प्रभाग २५ मध्ये भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पलता पवार, तर प्रभाग २९ मध्ये मुकेश शहाणे यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीपासून वंचित राहावे लागणार आहे. नवीन नाशिक भागातील या प्रकाराने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षातून काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्यासह पत्नी हर्षा बडगुजर आणि पुत्र दीपक बडगुजर यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. 

या घडामोडीला नाशिक भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची किनार असल्याचे बोलले जाते. या उमेदवारांना एबी फॉर्म देताना गोंधळ झाला होता. अर्ज बाद झाल्यानंतर चारही जणांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. शहाणे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. तथापि, प्रभाग 29 मधून अपक्ष लढण्यावर ते ठाम आहेत. दीपक बडगुजर यांच्यासमोर मुकेश शहाणे अपक्ष म्हणून लढणार आहेत.

आ. हिरे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार..

या घोळावरून नवीन नाशिकमधील पक्षाच्या दोन गटात ब्लेम गेम सुरु झाला असून आ. सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली आहे. या तिघांनीही प्रकरण गंभीर असल्याचे सांगत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपच्या इतिहासात जे घडले नाही, ते बडगुजर यांनी केल्याचा आरोप आ. हिरे यांनी केला. या गोंधळाला केवळ बडगुजर हे जबाबदार असल्याचेही त्या म्हणाल्या.

बडगुजर यांचे कानावर हात

दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सुधाकर बडगुजर म्हणाले, याबाबत निर्णय पक्षाने घेतला होता. आता पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असेल. कायदेशीर प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर दीपक बडगुजर यांचा अर्ज वैध ठरला. मुकेश शहाणे देखील भाजपचे आहेत. त्यामुळे पक्षासोबत चर्चा करून निर्णय होईल. या प्रकरणात पक्षाने निर्णय घेतले होते. एबी फॉर्म संदर्भात काय गोंधळ झाला याची मला कल्पना नाही. तथापि, आ. हिरे यांनी आपल्या समर्थकांना परस्पर एबी फॉर्म्स दिल्याची आपली माहिती असल्याचे ते म्हणाले.

Comments are closed.