- तपोवनातील प्रकारावर भाष्य; मोठी झाडं काढून रिलोकेट करणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कुंभमेळा आपली प्राचीन आणि सनातन परंपरा आहे, शिवाय तो आपला पर्यावरणाशी असलेला संबंध दृढ करणारा लोकोत्सव आहे. तपोवनात विनाकारण वृक्षतोड होणार नाही. आवश्यक तेव्हढीच झाडं कापली जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत केले.
आगामी कुंभमेळ्यासाठी तपोवनातील तब्बल १८०० पेक्षा अधिक झाडांची कत्तल करण्यावरुन सध्या नाशिकमध्ये राज्य सरकारविरोधात स्थानिकांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिककर तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी आक्रमकपणे संघर्ष करत आहेत. तपोवनातील झाडांची कत्तल न करता राज्य सरकारने साधुग्राम उभारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, साधुग्राम उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडं कापणं योग्य नाही. कमीतकमी झाडं कापायला पाहिजेत. पण आपल्याला वास्तवही लक्षात घ्यावं लागेल. महानगरपालिकने हा निर्णय का घेतला, याचा विचार करावा. प्रयागराज येथे जो कुंभमेळा झाला तो 15 हजार हेक्टर जागेवर झाला. नाशिकमध्ये साधुग्रामची 350 एकर जागा आहे. नाशकात रामबन आणि साधुग्रामच्या बाजूला दुसरी कोणतीही जागा नाही. झाडांच्या दाटीमुळे आता सध्याच्या ठिकाणी साधुग्राम तयार करणे शक्य नाही. याशिवाय, 2015-16 मधील गुगल इमेज बघितल्या तर त्यामध्ये याठिकाणी एकही झाड दिसणार नाही. त्यावेळी राज्य सरकारने 50 कोटी वृक्षरोपणाचा जो कार्यक्रम हाती घेतला होता, त्या अंतर्गत महानगरपालिकेने ही झाडे लावली होती. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे कापणे योग्य नाही. आम्ही यासंदर्भात विचार करत आहोत. काही मोठी झाडं काढून आम्ही रिलोकेट करणार आहोत. पण या विषयावर राजकारण होणे चूक आहे.
Comments are closed.