मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
गत काही दिवसांपासून राज्य सरकारमधील अनेक मंत्री आपापल्या वादग्रस्त कृत्य आणि विधानांमुळे वादात अडकले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, संजय गायकवाड, संजय शिरसाट असे अनेकजण वादात अडकले असून, यामुळे विरोधकांना टीकेसाठी संधी दिली आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त मंत्र्यांचा क्लास घेतला असून त्यांना सुनावले आहे. वादग्रस्त विधाने, बेजबाबदार वर्तन अजिबात खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दांत त्यांनी ही अखेरची संधी असल्याचा इशारा दिला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेलता. वादग्रस्त विधाने, बेजबाबदार वर्तन अजिबात खपवून घेतली जाणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी खडसावून सांगितलं आहे. असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी, यावर काय कारवाई करायची ती करूच असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. आता एकही प्रकार खपवून घेणार नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांकडून वादग्रस्त मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. जवळपास 20 मिनिटं देवेंद्र फडणवीसांची मंत्र्यांसोबत बैठक सुरु होती. मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे नाराजी जाहीर केली आहे.
Comments are closed.