NGN News
Latest Marathi News

दुर्गसंवर्धन अभियान ! समर्थ सेवा मार्गाचे तीनशे ठिकाणी स्वच्छतेसह बीजारोपण

  • रायगडावर आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत उद्या शुभारंभ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या अंतर्गत सक्रिय व कार्यरत असलेल्या पर्यावरण व प्रकृती विभागाअंतर्गत रविवार 22 फेब्रुवारी रोजी व्यापक दुर्ग संवर्धन अभियान हाती घेण्यात आले असून या अभियाना अंतर्गत राज्यभरातले तीनशेहून अधिक गडकिल्ल्यांवर स्वच्छतेसह विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रायगडावर आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ होणार आहे.

दुर्ग संवर्धन अभियाना अंतर्गत वर्षभर सातत्याने या प्रकारचे काम चालूच असते परंतु या कार्याला अधिक गती मिळावी म्हणून 22फेब्रुवारी रोजी राज्यभरातील महिला पुरुष सेवेकरी आपापल्या भागातील गडकिल्ल्यांवर जाऊन स्वच्छता करून तेथील देवदेवतांचा सन्मानही करणार आहेत. उपलब्ध जागेवर बीजारोपण करून भविष्यात या वृक्षवल्लीचे संवर्धन करण्याची मोहिमही या अभियाना अंतर्गत हाती घेण्यात आली असून गडकिल्ल्यांना लागून असलेल्या गावांमध्ये ग्राम अभियान राबवून लोकजागरण करण्यात येणार आहे. नव्या पिढीपर्यंत आपला संघर्षाचा परंतु तेवढाच गौरवशाली, अभिमानास्पद इतिहास पोहोचावा हा एक हेतू या अभियान मागे आहेच.

दुर्गसंवर्धन बाबत अधिक माहिती देताना आबासाहेब मोरे म्हणाले की” साडेतीनशे वर्षांपूर्वी परक्या, धर्मांध,जुलमी सत्तांचा नंगानाच महाराष्ट्रभर चालला होता.रयतेला सर्वच असह्य झाले पण हे सर्व अन्याय, अत्याचार सहन करण्यापलीकडे ते काही करू शकत नव्हते. पैसा,अडका, जमीन,जुमला,माय,बहिणीची अब्रू सर्वच धोक्यात होते.या सर्व अराजकातून सुटका करण्यासाठी ईश्वरीशक्तीने शिवाजी महाराजांच्या रुपाने जन्म घेतला आणि हिंदवी स्वराज्याची वाटचाल सुरू झाली. जुलमी सत्ता उलथावून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते गड,कोट, किल्ल्यांनी. शिवनेरी,तोरणा, पुरंदर, सिंहगड, राजगड, लोहगड, रायगड, हरिहर, कर्नाळा, देवगिरी, हरिश्चंद्र, रामशेज, बोरगड, सज्जनगड, विशाळगड, साल्हेर असे साडेतीनशे पेक्षा जादा किल्ले हिंदवी स्वराज्यासाठी आभूषणे ठरली. परंतु आज या किल्ल्यांची जी अवस्था आहे ती पाहता कुणाही संवेदनशील माणसाचे मन अस्वस्थ आणि घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. या घायाळ अवस्थेतून या शक्तीस्थळांची सुटका करून त्यांना गतवैभव प्राप्त करून देणे आज मोठे अवघड दिसते आहे परंतु आहे ती संपत्ती सांभाळून ठेवणे आपल्या हाती आहे. याचसाठी समर्थ सेवा मार्गाने दुर्ग अभियानाच्या मार्गातून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.”

या अभियानात समर्थ सेवेकऱ्यांसोबत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments are closed.