येवला/एनजीएन नेटवर्क
ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मिरवणूक होती. आजवर अनेक निवडणुका जिंकल्या अनेक वेळा मिरवणुका निघाल्या. परंतु आज निघालेली त्यातील ही सर्वात मोठी मिरवणूक होती. पुन्हा मिळालेल्या संधितून महाराष्ट्राची सेवा करण्याचं, नाशिक जिल्ह्यातील व मतदारसंघातील नागरिकांच्या विकासासाठी आपले काम सतत सुरू राहील. कोरोनाच्या काळात अतिशय महत्वपूर्ण ठरलेलं अन्न व नागरी पुरवठा विभाग यापुढील काळातही गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच छगन भुजबळ हे येवला मतदारसंघात दाखल झाले. यावेळी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
प्रारंभी अंगणगाव परिसरातील अहिल्यादेवी होळकर घाट येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. त्यानंतर महात्मा फुले नाट्यगृह येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास, शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व विंचूर चौफुली येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
ते म्हणाले की, सर्वांचा मनापासून आभारी आहे. आपलं हे प्रेम मला उत्साह वाढविणार, हिंमत देणार आणि विश्वास वाढविणार आहे. विकासापासून कोसोदूर असलेल्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी आपले सदैव प्रयत्न असून विकासाची गंगा मतदारसंघात आली. यापुढील काळात विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे जाईल तसेच येत्या काळात मतदार संघातील प्रत्येक गावात काम घेऊन भेटायला येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते म्हणाले की, सन २००४ साली माझ्यासमोर जुन्नर, धरणगाव, वैजापूर यासह विविध ठिकाणी लढण्यासाठी आग्रह होता. परंतु येवलेकरांच्या आग्रहास्तव विकास करण्याच्या दृष्टीने मी येवल्याची निवड केली. गेल्या पंधराहून अधिक वर्षात मतदारसंघात विकासाची अनेक कामे झाली. आता सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर येवल्यातील स्तगित कामांची स्तगिती उठवून कामे सुरू झाली. यामध्ये शिवसृष्टी, पुणेगाव दरसवाडी कालवा अस्तारिकरणासह विविध विकास कामे सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्पाला अधिक पाणी मिळण्यासाठी उपसा सिंचन योजना तीन आणि चारला लवकरच मंजुरी घेणार आहे. येवल्यातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी चीचोंडी औद्योगिक वसाहतीतील जागेचे दर कमी करून उद्योग विकासासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. हा पक्ष स्थापन करण्यासाठी छगन भुजबळ हे पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हाच आपला पक्ष असून घड्याळ हीच आपली निशाणी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जयदत्त होळकर, विष्णुपंत म्हैसधूने, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, ज्ञानेश्वर शेवाळे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, प्रा.अर्जुन कोकाटे, संजय बनकर, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, दिपक लोणारी, ॲड.बाबासाहेब देशमुख, संतू पाटील झांबरे, नगराध्यक्ष बंडू पहिलवान क्षीरसागर,
प्रमोद सस्कर, महेंद्र काले, नवनाथ काळे,डॉ. मोहन शेलार,राजेश भांडगे, बाळासाहेब गुंड, प्रकाश वाघ, कविता कर्डक, राजश्री पहिलवान, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, मलिक शेख, मनोज दिवटे,शहराध्यक्ष तरंग गुजराथी,तालुकाध्यक्ष डॉ, नंदकिशोर शिंदे, बापूसाहेब गाडेकर,प्रा,नानासाहेब लहरे, मयूर मेघराज,संतोष केंद्रे,सुनील बाबर,दीपक टकले,विशाल काथवटे,पंकज पहिलवान,जितू पहिलवान,कुणाल भावसार,राजू नागपुरे,मच्छिन्द्र मोरे, तुकाराम वाळुंज,एकनाथ साताळकर, संजय भोसले,छगन दिवटे,जितू कऱ्हेकर,राधेश्याम परदेशी, कुणाल क्षीरसागर,चेतन पुणेकर,अंबादास परबत,संतोष भोपळे,सुनील पवार,हेमचंद्र व्यवहारे,बाबुराव खानापुरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध गावांमध्ये जल्लोषात स्वागत
ना.छगन भुजबळ हे नाशिकहून येवल्याच्या दिशेने रवाना प्रथमतः नाशिक विमानतळ व जानोरी येथे त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. त्यांनतर छत्रपती संभाजीनगर चौक नवीन आडगाव नाका, शिलापुर, लाखलगाव, चांदोरी, पिंपळस, निफाड,नैताळे, बोकडदरे, विंचूर, भरवस फाटा, देशमाने, मुखेड, जळगाव नेऊर, एरंडगाव, रायते, अंगणगाव येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अंगणगाव ते येवला शहरापर्यंत भव्य रॅली
ना.छगन भुजबळ यांचं अंगणगाव येथे आगमन होताच पारंपरिक वाद्य, आदिवासी नृत्य, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण करत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जागोजागी उभ्या असलेल्या जेसीबी तून फुलांची उधळण करण्यात आली तसेच क्रेनच्या सहायाने विविध ठिकाणी पुष्पहार घालण्यात आले.