नाशिक/एनजीएन नेटवर्क
शैक्षणिक क्षेत्रातील ख्यातीप्राप्त नाशिक शिक्षण संस्थेचे (नाएसो) अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षीत्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवडे असा परिवार आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे रहाळकर यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रहाळकर यांच्या जाण्याने शिक्षण, समाजकारण क्षेत्रांतील दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
गेली अनेक वर्षे प्रा. रहाळकर यांनी नाशिक शिक्षण संस्थेच्या कामात स्वत:ला झोकून दिले होते. १९२३ मध्ये स्थापन झालेली नाशिक शिक्षण संस्था ही शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक ओळखली जाते. संस्थेच्या विविध शाळांमध्ये जवळपास २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. काही वर्षांपासून या संस्थेची जबाबदारी रहाळकर सांभाळत होते. अलीकडेच संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नानाविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी त्यांनी विविध संकल्पना मांडून पुढाकार घेतला होता. प्रा. रहाळकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
—————————————–
शिक्षण क्षेत्राची मोठी हानी
@ नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. नुकतीच शताब्दी पूर्ण करत असलेल्या या संस्थेच्या वाटचालीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. प्रा. रहाळकर यांच्या निधनाने नाशिकच्या शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ
मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य