नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
सीबीएसई बोर्डाने सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांना पूर्व-प्राथमिक ते बारावी पर्यतचे शिक्षण पर्यायी माध्यम म्हणून मातृभाषेत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित सर्व शाळांना आता इतर भाषांचा पर्याय देखील देण्याचा विचार करावा असे पत्र सीबीएसईने पाठवले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसईने उचललेल्या या पावलाचे स्वागत करत, ट्विटच्या माध्यमातून सीबीएसई बोर्डाला या निर्णयासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. सीबीएसई शाळांमध्ये पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्याबद्दल सीबीएसईचे अभिनंदन करतो. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार शाळांमध्ये भारतीय भाषा-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा मूळ उद्देश आहे. शिक्षणातून चांगले परिणाम दिसून येण्यासाठी ही एक उत्तम सुरुवात आहे, अशा आशयाचे ट्विट धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.