मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बँक खात्यामधील पैसे उकळल्याचे उघडकीस
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सीबीआय पथकाने ऑनलाईन फसवणुक आरोपाखाली इगतपुरीत बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यामधील पैसे उकळल्याचे उघडकीस आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. सदर छाप्यामध्ये अधिकाऱ्यांच्या पथकाने सात अलिशान गाड्यांसह १ कोटीहून अधिक रोकड, सोने, लॅपटॉप, मोबाईल आदि जप्त केले आहेत. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने यासंदर्भात प्रसृत केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी अर्थात ८ ऑगस्ट रोजी सायबर फसवणुकीविरोधात ही कारवाई करण्यात आली. याअंतर्गत सहा आरोपींसह काही अज्ञात व्यक्ती तसेच बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात एफआयआर नमूद करण्यात आली होती. ज्यामध्ये आरोप करण्यात आला आहे की, आरोपींनी काही अज्ञात व्यक्तींशी संगनमत करून अनेक लोकांची फसवणूक करण्याचा कट रचला, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते. यासाठी त्यांनी ‘अमेजन सपोर्ट सर्विसेस’ नामक एक बोगस कॉल सेंटर बनवून त्यामार्फत संशयितांनी दिशाभूल करणारे कॉल करून लोकांची मोठी आर्थिक फसवणूक केली .
अन्य देशांतील लोकही फसवणूक फेऱ्यात..
दरम्यान, या बोगस कॉल सेंटरमार्फत अमेरिका, कॅनडा तसेच अन्य देशांतील लोकांनाही गंडा घालण्यात आला. संशयित आरोपींनी त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स तसेच क्रिप्टो करन्सी नावाखाली अवैध पैसे देखील उकळले. हे रॅकेट चालवण्यासाठी एकूण ६० ऑपरेटर्संना कंपनीत भरती केले होते, ज्यामध्ये डायलर, व्हेरिफायर आणि क्लोजर अशा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सीबीआयच्या हाती मोठे घबाड..
सीबीआयने टाकलेल्या छाप्यात एकूण ४४ लॅपटॉप , ७१ मोबाईल फोन, १.२० कोटी रुपये रोख, ५०० ग्रॅम सोने आणि १ कोटी रुपये किमतीच्या सात लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर ५ हजार USDT क्रिप्टोकरन्सी (५ लाख रुपये) आणि २००० कॅनेडियन डॉलर गिफ्ट व्हाउचर (१.२६ लाख रुपये) चे अवैध व्यवहार आढळून आले आहेत. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Comments are closed.