अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पुण्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणाचे पडसाद सोमवारी नाशकात उमटले. शहरातील जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालावर मोर्चा काढत संबंधित बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्याची मागणी केली. तसे न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून बेमुदत धरणे धरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. समाजाच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना निवेदन सदर केले.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे. शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जाहीर आरोप करीत जागेच्या व्यवहारात त्यांचा हात असल्याचे म्हटले आहे. या व्यवहाराशी संबंधित बांधकाम व्यावसायिक मोहोळ यांचा भागीदार असल्याचा धंगेकर यांचा आरोप आहे. मोहोळ यांनी हे आरोप फेटाळले असले तरी पुण्यातील जैन समाज त्यांच्या स्पष्टीकरणावर खुश नाही. याच कारणामुळे व्यवहार रद्द न झाल्यास येत्या १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा जैन मुनींनी इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बांधवाना पाठींबा व्यक्त करण्यासाठी नाशिकमधील जैन बांधव आज एकवटले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून व्यवहार रद्द करण्याची मागणी केली.
याप्रसंगी सचिन गांग, सोनल कासलीवाल-दगडे, संतोष मंडलेचा, महेश शाह, पवन पटणी, प्रमोद लोहाडे, सुनील कासलीवाल, राहुल कासलीवाल, अजित सुराणा, कल्पना बुरड,सुमेर काला, पारस लोहाडे, हेमंत दुगड, लोकेश पारख, अनिल नहार, नीता मोदी, राजेंद्र कुमट, विजय लोहाडे, राजेंद्र शाह. सुनील चोपडा आदिसह समाजबांधव सहभागी झाले.
Comments are closed.