मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर अद्याप खातेवाटपाचा तिढा कायम आहे. राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, खातेवाटप जाहीर झाले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता दिल्लीत धाव घेतली आहे. खातेवाटपावर भाजप श्रेष्ठींसोबत चर्चेची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे देखील दिल्ली दौऱ्यात आहेत, अशी चर्चा आहे.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बैठक झाली. पुन्हा मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीगाठींमधूनही खातेवाटपावर सहमती होऊ शकलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या एन्ट्रीने शिवसेना-भाजप खातेवाटपाची समीकरणं बिघडली आहेत. जी खाती शिवसेना-भाजपकडे जाणार होती, त्यापैकी 9 मंत्री आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचा कोटा कमी झाला आहे. एकूण 42 पैकी उरलेल्या 14 मंत्रिपदांमध्ये तीनही पक्षांना कसं सामावून घ्यायचे असा प्रश्न आहे.