मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्य मंत्रिमंडळाचा याच महिन्यात पुन्हा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. आताच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या आणखी काही आमदारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे गेल्यावेळी प्रतीक्षेत असलेल्या आमदारांच्या पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या वेळी शिंदे गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार का, असा प्रश्न आहे.
आता होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार आहे. शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना यात संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाची अपेक्षा लावून बसलेले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सरकार स्थापनेनंतर आतापर्यंत दोन वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यात दुस-या वेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे शिंदे गटाचे तसेच भाजपचेही आमदार नाराज झाले होते. मात्र, आता या नाराज आमदारांना खुश करण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न असणार आहे.