मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्षाहून अधिकचा कालावधी लोटूनही अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. म्हणूनच राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांसह शिंदे गटातील काही नेत्यांनी उघडपणे टीका केली आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरल्याचे समजत आहे.
येत्या १० ते १२ दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. नवीन मंत्रिमंडळामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकी पाच नेत्यांची मंत्रीपदावर वर्णी लागणार आहे, असंही समजत आहे. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना तूर्तास पूर्णविराम मिळणार आहे.