नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क
भाजप प्रणीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. आज झालेल्या निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 300 मते मिळाली. आज 767 खासदारांनी मतदान केले होते. यातील 15 मते अवैध ठरली, तर 752 मते वैध होती. विरोधी उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे ऐनवेळी इंडिया आघाडीची मते फुटली असल्याचे समोर आले आहे.
राधाकृष्णन हे भारताचे 17 वे उपराष्ट्रपती असणार आहेत. निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास इंडिया आघाडीतून क्रॉस वोटिंग झाले असल्याचे समोर आले आहे. एनडीएकडे एकूण 427 खासदार होते, मात्र जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसच्या 11 खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केले, त्यामुळे हा आकडा 438 पर्यंत पोहोचते. मात्र सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची एकूण 452 मते मिळाली, याचा अर्थ 14 विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मते दिली. याच कारणामुळे बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 314 मते मिळायला हवी होती, मात्र त्यांना 300 मतांवर समाधान मानावे लागले.
Comments are closed.