सप्तश्रृंगी गड/तुषार बर्डे
सप्तशृंगी गडावरून खामगाव (जि. बुलढाणा) च्या दिशेने निघालेल्या बसला सप्तश्रृंगी गड घाटात अपघात झाला आहे. सकाळी ७ वाजेच्या दरम्यान बसचा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. बसमध्ये एकूण २२ प्रवासी होते. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी भेट देत जखमींवर उपचार करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या.
अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून मंगळवारी सकाळी बस सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव असा बसचा प्रवास सुरू झाला होता. बस घाटातून नांदुरीकडे जात असताना सप्तश्रृंगी गडापासून पाच किमी अंतरावर असलेल्या घाटातील गणपती मंदिर या ठिकाणी ड्रायव्हरचे बस वरील नियंञण सुटल्याने थेट अंदाजे ३०० फूट दरीत कोसळली. बसमधील मोढी (ता. अमळनेर) येथील महिलेचा (वय अंदाजे ५० वर्षे ) मृत्यू झाला. जखमी प्रवाशांपैकी ५ ते ६ जणांना नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनेची माहिती घेत ते सप्तशृंगी गडाकडे रवाना झाले. संबंधित यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. केन्द्रीय आरोग्य राज्यमंञी भारती पवार यांनी सहा. जिल्हाधिकारी कळवण यांच्याशी फोनवरून अपघाताची माहिती घेऊन जखमी रुग्णांना उपचार व सर्व सुविधा पुरविण्यासंबंधी सुचना दिल्या.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, पोलीस निरीक्षक महेश निकम, देवी संस्थानचे व्यवस्थापक, कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, सप्तशृंगी गड ग्रामस्थ, नांदुरी ग्रामस्थांनी जखमीना मदत करून वणी येथे रूग्णालयात पाठविण्यास मदत केली.
———————————
@15 वर्षांपूर्वीही अशीच मुबई येथील खाजगी बसेसचा अपघात झाल्याची आठवण यावेळी ग्रामस्थांना झाली. त्यावेळी बस 200 फूट दरीत बस गेल्याने ४० भाविकांना आपला प्राण गमावले लागले होते. या घटनेमुळे काळजाचा थरकाप उडाल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
———————————
@ सप्तशृंगी गड घाटात पावसासह धुके मोठया प्रमाणावर असते. यासाठी पाच ते सहा कि.मी घाटात रिफलेक्टर बसविणे गरजेचे असुन संरक्षक भिंतींची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. परिणामी हा परिसर मुत्युचा सपाळा बनला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप भाविकभक्तसह ग्रामस्थ करीत आहेत.