घोटी/राहुल सुराणा
इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात बुधवारी रात्री दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीचे प्रमाण वाढले असतानाच त्यातच आता चोरट्यांनी व्यापारी व किरकोळ दुकानदारांच्या आस्थापानांकडे लक्ष केंद्रित केल्याने घोटी शहराच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार पेठेत गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या व दिवसाढवळ्या होणाऱ्या लुटमारीचे प्रकार वाढल्याने ग्रामस्थ काही अंशी चिंतेत व भयग्रस्त असतानाच काल दि 11 रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बाजार पेठेतील येस बँकेच्या समोरील कपड्याचे दुकान तसेच किराणा दुकान फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला.
घोटी नाशिक मार्गावरील येस बँकेच्या समोरील कुणाल नंदलाल राखेचा यांच्या कपड्याच्या दुकानात घरफोडी करून चोरट्यांनी अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला याबरोबरच किराणा व्यापारी जवरीलाल लालचंद चोरडिया यांच्या किराणा दुकानातील लोखंडी पत्र्याचे आच्छादन तोडून दुकानात चोरट्यांनी शिरकाव करून गल्ल्यात ठेवलेले विविध मूल्याच्या नोटा अंदाजे 35 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले.
पोलिसांची गस्त नसल्याने तसेच परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने चोरट्यांनी संधी मिळाल्याची चर्चा आहे. शहरात दिवसाही भुरट्या चोऱ्यांचे, वाहनांची व्हील, बॅटरी चोरीचेही तसेच दुचाकी चोरीचेही प्रमाण वाढल्याने शहरातील सुरक्षा वाऱ्यावर असल्याची जाणीव शहरवासीयांना होत आहे. घोटी शहरात सर्वच पोलीस अधिकारी, बहुतांश कर्मचारी हे नव्याने बदलून आल्याने त्यांनी शहरात दिवसा व रात्रीची गस्त वाढवून शहरवासीयांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. घरफोडीतील तसेच भुरट्या चोरट्यांचा प्रतिबंध करावा अशी मागणी ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.