NGN News
Latest Marathi News

सटाणा नगरपरिषदेचा 225 कोटींचा अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर

** श्रीकांत रौंदळ

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

सटाणा नगरपरिषदेचा 225 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगरपरिषदेच्या सभागृहात आज झालेल्या विशेष सभेत नगराध्यक्ष हर्षदा राहुल बाबा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ व नगरसेवकांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी ज्योती भगत व लेखापाल निलेश वाघ यांनी 225 कोटी इतक्या रकमेचा व दोन लाख 36 हजार 153 शिलकेचा अर्थसंकल्प सादर केला, त्यास सभागृहात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

या अर्थसंकल्पात श्री देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवाच्या विविध सोयीसुविधांसाठी शासनाच्या यात्रा अनुदान योजनेतून एक कोटी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय योजना अंतर्गत सटाणा शहर मल निसारण प्रकल्प तथा भुयारी गटार योजने करिता 100 कोटी, शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी पाच कोटी, नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी पाच कोटी, अक्षगंगा तथा आराम नदी तट संवर्धन प्रकल्प अहवाला करिता पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही कर वाढ व दरवाढ करण्यात आलेली नाही.

केवळ सव्वा दोन लाख रुपये शिल्लक दाखवलेल्या या अंदाजपत्रकात विद्युत विहिरी, पाणी बिल, सेवानिवृत्त सेवकांचे देणे असे सर्व मिळून सुमारे 15 ते 17 कोटी रुपये इतके देणे बाकी असतानाही सटाणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी सक्षम ठरवू असा विश्वास नगराध्यक्ष हर्षदा राहुल बाबा पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.