आयोजक आबासाहेब मोरे यांची माहिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवात विधवा,विधुर,घटस्फोटीत तसेच आत्महत्याग्रस्त, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मुलं-मुली, दिव्यांग आणि इतर सर्व धर्मीय विवाह इच्छुकांसाठी भव्य वधु वर मेळावा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी दिली.
गेली 15 वर्ष जागतिक या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.जानेवारी 26 मध्ये या महोत्सवाचे 16 वे वर्षे असून यात गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी व त्याचे आत्मबल वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम,उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. 23 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीत युथ फेस्टिवल मैदान येथे हा कृषी महोत्सव संपन्न होत असून वधु वर नाव नोंदणी, स्थळांची माहिती तसेच शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण विवाहपूर्व व विवाहोत्तर समस्यांवर मार्गदर्शन यानिमित्ताने तज्ञ सेवेकरी करणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना आबासाहेब मोरे म्हणाले की गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी आतापर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर हजारो शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचा उत्कर्ष कसा साधता येईल यावर सातत्याने चिंतन केले आहे. आज शेतकऱ्यांच्या मुला मुलींचा विवाह ही एक मोठी समस्या बनली आहेत पण या बरोबरच विविध आजार,अपघात यामुळे येणारे एकाकीपण आणि संस्कारा अभावी व मार्गदर्शनाअभावी घडणारे मोठ्या प्रमाणातील घटस्फोट यामुळे विवाह समस्या अधिक गडद झाली आहे.अपेक्षित वयात मुला मुलींचे विवाह होत नसल्यामुळे ही एक मोठी सामाजिक समस्या आज आपल्या सर्वांना भेडसावत आहे.याबरोबरच खोट्या प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकरी कर्जबाजारी होतात आणि आपल्या मुला-मुलींच्या लग्नकार्यात लाखो रुपये खर्च करून शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.या सर्वच गोष्टींवर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सातत्याने शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे.विवाह ही अत्यंत गुंतागुंतीची समस्या समाजासमोर आज उभी असताना यातून मार्ग काढण्यासाठीच या जागतिक कृषी महोत्सवात 24 जानेवारी रोजी विधवा, विधुर,घटस्फोटीकांसाठी तर 25 जानेवारी रोजी विवाह इच्छुक ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी आणि 26 जानेवारी रोजी सर्वच जाती-धर्मीय शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी आणि सर्वांसाठीच वधुवर परिचय मेळावा आयोजित केला आहे.याशिवाय 23 ते 27 जानेवारी दरम्यान जागतिक कृषी महोत्सवात विवाह संस्कार विभागाच्या दालनामध्ये पाचही दिवस सर्वांसाठीच वधू वर नाव नोंदणी आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. यापैकी ज्या इच्छुकांचे विवाह जमणार आहेत त्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह वैदिक पद्धतीने संपन्न होणार आहे.
या आधीच्या जागतिक कृषी महोत्सवात दरवर्षी अनेक विवाह संपन्न झाले आहेत म्हणून या उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांनी आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात किंवा दिंडोरी येथील प्रधान केंद्रात किंवा श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे संपर्क साधावा असे आवाहन आबासाहेब मोरे यांनी केले आहे.
Comments are closed.