- भुजबळ नॉलेज सिटी ( बीकेसी ) येथे विद्यार्थी आणि पालकांशी साधला संवाद
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘खिलाडी’ म्हणून सर्वपरिचित असलेल्या बॉलीवूडच्या सुपरस्टार अक्षय कुमारच्या उपस्थितीने आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी परिसरात आयोजित ‘विरासत उत्सव २०२६’ ला वेगळाच रंग चढला. शनिवारी पार पडलेल्या Grand Finale मध्ये हजेरी लावलेल्या अक्षय कुमारने उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी साधलेला संवाद वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
‘आयुष्यात यशस्वी व्यायचे असेल तर शिस्त पाळा, माता-पित्यांची सेवा करा आणि उच्च शिक्षण घेवून स्वतःचे यशस्वी करियर घडवा’ या त्रिसूत्रीचा कानमंत्र देत अक्षयने उपस्थितांची मने जिंकली. मंचावर क्रेनमधून आगमन झाल्यानंतर मराठीतून ‘ जय महाराष्ट्र, नाशिक’ अशी साद अक्षयने घातल्यानंतर उपस्थितांनी प्रचंड जल्लोष केला. यावेळी आपल्या ‘भूत बंगला’ चित्रपटातील गाण्यावर अक्षयने धरलेला ठेका तरुणाईला चांगलाच भावला. यावेळी अभिनेत्री वामिगा गब्बी, जोया अफरोज यांसह भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, शेफाली भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मंत्री भुजबळ यांच्या हस्ते अक्षयचा येवला पैठणी, सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.
शिस्त, वेळ पाळा..
हिंदी आणि इंग्रजी भाषेसोबत मराठी भाषेवर पकड असलेल्या अक्षय कुमारने उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. आयुष्यात यशाचे शिखर गाठायचे असेल तर शिस्त आणि वेळ पाळा. कितीही मोठ्या यशाची शिडी चढलात तरी माता-पित्यांचा विसर पाडू देवू नका. त्यांची सेवा करण्याची संधी दवडू नका, आपण घेत असलेल्या शिक्षणाला कौशल्याधारित उच्च शिक्षणाची जोड द्या आणि भविष्य उज्ज्वल बनवा, असा मोलाचा सल्ला अक्षयने विद्यार्थ्यांना दिला.
Comments are closed.