पालघर/एनजीएन नेटवर्क
पालघरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्पदंश झालेल्या एका इसमावर अंधश्रद्धेतून चक्क अघोरी उपचार करण्यात आले. हे उपचार कोणत्या बाबा-बुवाच्या आश्रमात नव्हे तर रुग्णालयात करण्यात आले. तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर समोर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, तलासरी तालुक्यातील करजगाव येथील सोन्या लाडक्या ठाकरे यांना सर्पदंश झाला. त्यांची प्रकृती बिघडू लागल्याने त्यांना तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. येथे त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. पण काही वेळाने येथे एक मांत्रिक आला. आणि त्याने रुग्णावर त्याच्या पद्धतीने उपचार करण्यास सुरुवात केली. ही घटना पाहुन रुग्णालयातील डॉक्टरदेखील चक्रावून गेले. रुग्णालयातच एका मांत्रिकाने त्यांच्यावर अंधश्रद्धेतून अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही वेळातच सोमा ठाकरे यांची प्रकृती आणखीन बिघडली असून त्यांना सध्या या रुग्णाला दादरा नगर हवेलीतील सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.