** एनजीएन नेटवर्क
नैसर्गिकरीत्या भ्रष्ट पक्ष (Naturally Corrupted Party) म्हणून नरेंद्र मोदी यांनी जाहीर चिरफाड केलेल्या पक्षात उभी फूट पाडून ज्यांच्यावर मूळ आरोप आहेत, त्या शीर्षस्थ नेत्याला थेट उपमुख्यमंत्रीपद देवून भाजपने ‘पार्टी विथ डिफरन्स’ चा अनोखा नमुना सादर केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील संकलित भ्रष्टाचाराचा सत्तर हजार कोटींचा आकडा आणि पवारांची घराणेशाही यांवर मोदी यांनी चारच दिवसांपूर्वी शरसंधान केले होते. मग भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेले पक्षजन अचानक सभ्य वाटून भाजपने त्यांना पवित्र करून घ्यावे, असे काय घडले, हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला आहे. खुद्द भाजपमधील बुद्धिवंतही श्रेष्ठींच्या या निर्णयाने संभ्रमित, आचंबित झाले असतील तर नवल नाही. सगळ्या राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवरील सर्वसामान्यांचा विश्वास ढळावा, अशा वर्षभरातील दोन घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. वाजपेयी-अडवाणी यांच्या काळात तत्वासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागणारा म्हणून ख्याती असलेल्या भाजपने आता ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’ चा अंगीकार केल्याचे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.
गेल्याच वर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील चाळीस शिलेदारांना कवेत घेत भाजपने मराठी मुलखात राजकीय भूकंप घडवून आणला होता. त्या राजकीय कूस बदलामागे ठाकरेंची जिरवायची, बदला घ्यायचा अशी मोदी-शाह-फडणवीस या त्रिमूर्तीची भावना होती. आताच्या घडीला पवारांना नामोहरम करताना त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील मोदी विरोधकांना बळ देणारा पुढाकार भाजपला खुपत होता. त्यावर जालीम उपाय म्हणून भाजप ‘चाणक्या’च्या खेळीत पवारांना चीतपट करण्यासाठी ‘घरभेदी’ शोधण्यात येवून पुढील सापस्कार पार पडले गेले. शरद पवार आणि अजित पवार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू केव्हाच नव्हत्या. वारसदाराच्या लढाईत ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे ‘मूल्य’ दुर्लक्षित करून पुत्र उद्धव यांना कौल दिला, तेच तंत्र शरद पवार यांनी अजित पवारांना अव्हेरत कन्या सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात वजन टाकून अवलंबले. वर्षानुवर्षे सुरु असलेली पवार काका-पुतण्यातील सुप्त लढाई जितकी देवेंद्र फडणवीस यांना ज्ञात होती, तितकीच ती दिल्लीश्वर भाजपेयींना अवगत होती. वयोमानापरत्वे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर मोठ्या पवारांची पकड ढिली होत चाललीय, याचा फायदा अजित पवार आणि भाजप यांनी ‘साथ-साथ’ घेण्याचा डाव रचला आणि पहिल्या पायरीत तरी तो यशस्वी झाला देखील. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि इतर आठ जणांना मंत्रिपदे बहाल करून भाजपने ठाकरेंनंतर महाराष्ट्रातील पवार घराण्याला राजकीयदृष्ट्या वाळवी लावली आहे. शिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीत ‘मिशन ४५’ चा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी पाऊल टाकले आहे.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी पार पाडून मैत्रीच्या नव्या अध्यायाला प्रारंभ केला होता. तेव्हापासूनच शरद पवार सावध झाले होते. आज न उद्या अजितदादा पक्षाला भाजपच्या दावणीला बांधतील, हे न ओळखण्याइतपत पवार दुधखुळे नाहीत. म्हणूनच त्यांनी संघटनात्मक अंगाने दादांना सामावून घेण्याकडे दुर्लक्ष केले. सुप्रिया ह्याच आपल्या राजकीय वारसदार आहेत, हे त्यांना कार्यकारी अध्यक्षपद देवून पवारांनी अप्रत्यक्षरीत्या दादांना बाहेर जाण्याचा मोकळा करून दिला होता. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असेलही, तथापि, भ्रष्ट म्हणून हिणवलेल्या पक्षातील नेत्यांना सन्मानाने मंत्रिपदे देताना भाजपला आपल्या रंग बदलण्याच्या विसंगत भूमिकेचे काहीच वाटू नये, हे धक्कादायक आहे. खुद्द अजित पवार यांच्यावर पाटबंधारे, शिखर बँक, लावासा प्रकरणांतील घोटाळ्याचे आरोप आहेत. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आदींमागील चौकाश्यांचे शुक्लकाष्ठ संपलेले नाही. मग विरोधकांचे ‘वाशिंग पावडर’चे आरोप योग्यच असल्याच्या मुद्द्याला भाजपनेच बळकटी दिली, असा अर्थ काढणे सोयीचे ठरेल. ज्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात फडणवीस यांनी रान उठवले, त्यांची जेलवारी घडवून आणली, त्यांच्याच पक्षाच्या इतर नेत्यांना पवित्र करून सरकारचा भाग बनवण्याचा भाजपचा पवित्रा आश्चर्यजनकच नाही तर धक्कादायक आहे. बरं, पवारांना राजकीय धोबीपछाड देताना अवघ्या तीन तासांच्या घडामोडीत बंडखोरांचा शपथविधी करवून घेण्याबाबत भाजपने दाखवलेली आगतिकताही अनाकलनीय वाटते. पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी जादूची कांडी फिरवून समीकरणे बदललीत, त्याची पुनरावृत्ती आता होवू नये म्हणून तर भाजपने तसे केल्याचा निष्कर्ष निघाल्यास तो अयोग्य म्हणता येणार नाही.
या सगळ्या घडामोडी लक्षात घेता भाजपला महाराष्ट्रात विरोधकांना राजकीयदृष्ट्या कंगाल करण्याचा अंतस्थ हेतू स्पष्ट झाला आहे. ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’चे समीकरण प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तत्वांची कत्तल करण्यात आम्ही मागे नाही, याचा वस्तुपाठ एरव्ही तत्वाधीष्ठीत राजकारणाचे पोवाडे गाणाऱ्या या पक्षाने दिला आहे. मतांची झोळी भरण्यासाठी आश्वासंनाचा रतीब घालणे सोपे असते. मात्र ती पाळली न गेल्यास, त्यांची पायमल्ली केल्यास एखाद्याला डोक्यावर घेणारी जनता पायाखाली आणण्यास अवधी लावत नाही, हे व्यावहारिक सत्य पचवण्याची वेळ भाजपच्या वाटेला एवढ्या लवकर येवू नये म्हणजे झाले. घोडा मैदान जवळ आहे…