नाशिक/एनजीएन नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारमध्ये सारे आलबेल आहे. जाहिरात वा अन्य कोणत्याही मुद्द्यावरून कुठल्याही प्रकारचा वाद नाही, असा दावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज येथे केला.
उपाध्ये म्हणाले, केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनांना नवा आकार दिला. दर चार दिवसागणिक एक नवी किंवा सुधारित योजना देशात साकारली आहे, त्याचे लाभ सामान्य जनतेला मिळत आहेत. भ्रष्टाचारमुक्त सुशासन, सर्वांच्या सहयोगाने सर्वांचा विकास, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानातून कन्या जन्मास प्रतिष्ठा मिळवून देणे, बेघरांना हक्काचे छप्पर देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतून अडीच कोटींहून अधिक कुटुंबांना मिळालेली सावली, जल जीवनद्वारे २० कोटी घरांत पोहोचलेल्या पेयजलाच्या वाहिन्या, उज्ज्वला योजनेतून साडेआठ कोटी घरांत गेलेले सिलिंडर, सौभाग्य योजनेतून तीन कोटी घरांना मिळालेली वीज जोडणी आदींची माहिती दिली. याप्रसंगी सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, भाजप प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, आ.देवयानी फरांदे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नाशिक महानगर भाजप अध्यक्ष गिरीश पालवे, आदी उपस्थित होते.
दंगलीची चौकशी सुरु
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जातीय दंगलींविषयी पत्र लिहिले आहे. वास्तविक इतिहास तपासून पहा, या दंगलीचा कोणाला फायदा झाला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री फडणवीस हे या सामाजिक, जातीय दंगलींमागे कोण आहेत, याची चौकशी करीत असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले