मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्ष फोडण्याचा भाजपने तब्बल तीन वेळा प्रयत्न केला. आधीच्या दोन वेळेला त्यांना यश आले नाही. मात्र, तिसऱ्यावेळी त्यांनी तगडी रणनिती आखली अन् अजित पवार त्यांच्यासोबत जात सत्तेत सहभागी झाले, असा गौप्यस्फोट खा. सुप्रिया सुळे यांनी केला. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले आहे.
खा. सुळे म्हणाल्या, देशात लोकशाही आहे आणि अजित पवार यांनी लोकशाहीत एक नागरिक म्हणून त्यांचा निर्णय घेतला. ते परत येतील की नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु आम्ही कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राजकारणात काहीही झाले तरी पवार कुटुंब परिवार म्हणून कायम एकत्र राहील असा मेसेज सुप्रिया सुळे यांनी या वक्तव्यातून दिला आहे. अजित पवार गटाशी त्यांची लढाई वैचारिक सुरु आहे. मात्र कुटुंब म्हणून पवार एक आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्षातील गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. पण दुसरा गट हा सत्तेत सहभागी नाही. पण, तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर पक्षात कोणतीही फूट नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं