भाजपचा निवडणूक कुंभ पर्वातील ‘अमृत वचननामा‘ जारी; आश्वासनांचा पाऊस
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महापालिकेत सत्ता पुन:प्राप्तीसाठी शंभर प्लस जागांचा नारा प्रत्यक्षात आणण्याच्या हेतूने भाजपने निवडणूक कुंभ पर्वातील ‘अमृत वचननामा‘ जारी केला आहे. पावसाळी नाले आणि सांडपाणी व्यवस्था विलगीकरण, शाळा परिसरात सुरक्षा व्यवस्था उभारणी, फुटपाथ केंद्रित शहर रचना, स्पर्धा परीक्षांसाठी कार्यशाळा आदी कलमांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला आहे. प्रभागनिहाय नवे उद्यान, मोठ्या स्वरुपात वृक्षारोपण, हरित क्षेत्र वृद्धी या मुद्द्यांना प्राधान्य देताना भाजपने वादग्रस्त ठरलेल्या तपोवन वृक्षतोडीच्या विषयाला मात्र फाटा दिला आहे.
पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात ‘अमृत वचननामा‘ प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी आ.सीमा हिरे, आ.राहुल ढिकले, महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, महानगर सरचिटणीस सुनिल देसाई आदी उपस्थित होते. पायाभूत सुविधा,आरोग्य सेवा, शिक्षण क्षेत्र व हरित आणि स्वच्छ नाशिककरीता भाजप कटीबध्द असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महापालिकां प्रशासनातील पारदर्शक कारभारासाठी ऑनलाईन सेवा, प्रशासकीय खर्चाची ऑनलाईन ऑडीट प्रणाली, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, तक्रार निवारण केंद्र, बहुस्तरीय वाहनतळ, इलेक्ट्रिक बससेवा प्रमाण वाढवणे, सोमेश्वर धबधबा तसेच पंचवटी, गंगाघाट, पांडवलेणी आदींचे सौंदर्यीकरण, धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना, महिलांसाठी प्रभागनिहाय पिंक शौचालये, महिला सुरक्षा मदतकक्ष, झोपडपट्टी पुनर्विकास, गरजू विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आदी मुद्देही या वचननाम्यात अंतर्भूत करण्यात आले आहेत.
आमदारांच्या माध्यमातून विकास
गेल्या काही वर्षांत पक्षाचे देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले हे आमदार शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या माध्यमातून विकास साधल्याचा दावा महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार यांनी केला. मराठा वसतिगृह, सावित्रीबाई रुग्णालय,सुपर स्पेशलिटी वैदयकिय विभाग, पायाभूत सुविधांसाठीचे प्रकल्प, धार्मिक व सांस्कृतिक केंद्रांची कामे,पाणी स्वच्छता पर्यावरण यांचा त्यामध्ये समावेश आहे. नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेचा नवा अध्याय सुरु होत असून बाहय रिंगरोड प्रकल्प, व्दारका सर्कल अंडरपास यांच्यासह रस्त्यांचे विस्तारिकरण व कॉक्रीटीकरण अनेक कामे मंजुर तर काही कामे प्रस्तावित असल्याचे केदार यांनी सांगितले.
——
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठीचे अमृत वचन म्हणजे दुरदृष्टीने आखलेल्या पायाभूत विकास कामांचा ठोस आराखडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे केंद्र आणि राज्यात अनेक लोक कल्याणकारी योजना नाशिक शहराच्या विकासासाठी राबविल्या गेल्या आहेत. पायाभूत सुविधा,आरोग्य सेवा, शिक्षण क्षेत्र व हरित आणि स्वच्छ नाशिककरीता भाजपा कटीबध्द आहे.
–सुनील केदार, महानगर जिल्हा अध्यक्ष, नाशिक
Comments are closed.