एनजीएन न्यूज नेटवर्क
पृथ्वीतलावरील मह्त्तम राजकीय पक्ष अशी शेखी मिरवणा-्या भाजपमधील सुंदोपसुंदी हळूहळू वर्धिष्णू व्हायला लागलीय म्हणायला, अनेक दाखल्यांंचे सादरीकरण करता येईल. बात दिल्लीतली असो की गल्लीतली, पक्षाच्या घोडदौडीला माझ्या प्रयत्नांची चाकं बळ देत असल्याची अहंभावी वृत्ती कार्यकर्त्यांमध्ये भिनत चाललीय. ही पक्षाासाठी धोक्याची घंटा ठरावी. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणत कॉंग्रेसी गटबाजीच्या राजकारणाच्या नावे बोटे मोडणा-्या भाजपच्या कपाळी तसाच शिक्का बसण्याची वेळ आली आहे. नाशिकमधील अलीकडील घडोमोडींवर दृष्टीक्षेप टाकला तर या पक्षाचा ‘पार्टी विथ डिफरन्सेस’च्या रोडमॅपवर केव्हाच प्रवास सुरू झाल्याचे म्हणता येईल. पक्षातील अलीकडील मोठे इन्कमिंग आणि जाहीर झालेली शहर कार्यकारिणी त्याचे मूळ ठरले आहे. थोडक्यात, हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असा संदेश यानिमित्त भाजपेयींना देण्याचे कोणी धाडस केल्यास ती अतशियोक्ति ठरणार नाही.
विस्तारासह महापालिकेत एकहाती कारभार निर्माणासाठी पक्षाने ( खरेतर नेतृत्वाने ) सुरू केलेली उठाठेव आज नाही तर उद्या केव्हातरी अंगलट येणार, याची चुणूक दिसण्यास प्रारंभ झाला आहे. राजकीय महत्वकांक्षेपोटी भाजपच्या कमळावर स्वार झालेल्यांना उद्याच्या निवडणूकांत डावलले गेल्यास ‘देवाभाऊंचे जादुई नेतृत्व’ अथवा ‘जामनेरच्या भाऊंची संकटमोचकी लीडरशीप’ बासनात टाकण्यालायक वाटण्यास अवधी लागणार नाही. नवीन नाशकातील एका सोहळ्यात जामनेरच्या भाऊंसमक्ष अमळनेरच्या भाऊंनी स्थानिक आमदारांसंदर्भात दिलेला गर्भित इशारा त्याची नांदी ठरणार आहे. जनाधाराच्या पाठिंब्यावर लोकप्रतिनिधीत्वाचे बिरूद मिरवणाऱ्याना जेव्हा अहंभावाचा वारा लागतो, तेव्हा तो राजकीय पक्ष अशा नेतृत्वाचा बटीक बनल्याचे मानले जाते. कारण तिथे पक्ष नव्हे तर ते नेतृत्व सबळ असल्याची जाणीव करून दिली जाते. उद्या कोणत्याही निवडणूका जाहीर झाल्या तर पहिली लढाई भाजप विरूध्द भाजप अशीच राहील. मग पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा पाडाव करायला सक्षम विरोधकाची गरजही भासणार नाही. कॉंग्रेसमध्ये जे घडले, त्याचे टप्पे भाजपमध्ये सुरू झाले आहेत. सत्तेची ऊब आहे, तोपर्यंत मतभेदांचे चटके बसण्याचे कारण नसते. पण मावळतीचा प्रारंभ झाला की पक्षाची शकले उडण्यास वेळ लागत नाही. नाशिक भाजपचा ताबा बाहुबली घेताहेत. आज परस्परांविरोधात उक्ती आणि कृतीचा अवलंब करणारे उद्या स्वहित साधले गेले नाही तर मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान म्हणवणा-्यांचे जाहीर वाभाडे काढण्यास कमी करणार नाहीत. कारण भाजपातील फुगवटा पक्षप्रेमाखातर नव्हे तर सत्तातूरांच्या बेगडी निष्ठेपायी तयार झाला आहे, याची प्रचिती नेतृत्वास येण्यास फार अवधी लागणार नाही.
आयारामांची बात पक्ष प्रतिमेला डंख मारणारी ठरत असतानाच नाशिक शहर कार्यकारिणीचा मुद्दाही भाजपची वाटचाल कोणत्या दिशेने चाललीय, याचे प्रत्यंतर देणारा ठरावा. भाईभतिजेगिरीला परखड विरोध असलेल्या मोदी-शहा यांच्या राजनितीला केराची टोपली दाखवण्याची महती नाशिककर भाजपेयी नेतृत्वाने अधोरेखित केलीय म्हणायची. कार्यकारिणीवर दृष्टीक्षेप टाकल्यास आमदार-प्रभावित नामावली असा तिचा उल्लेख करता येईल. पक्षात निष्ठेला गौण आणि ‘इतर’ घटकांना प्रधानस्थान मिळाले आहे. पक्षांतर्गत असंतोषाच्या ठिणगीची खुद्द संकटमोचकांनाही जाणीव करून देण्यात आली आहे. त्यावरही शाब्दिक कोटी करून नाराजांची समजूत काढली जाईल. पण पक्षात जे कधी घडत नव्हते, ते अलीकडे वारंवार घडायला लागले आहे. या घडामोडींना उद्या पक्षातील लोकशाही वा वैचारिक जिवंतपणा वगैरे विशेषणांचा मुलामा दिला जाईल. पण ती वस्तुसस्थितीकडे सोईस्कर डोळेझाक असेल. भाजप नेतृत्वाने वेळीच समतोल भूमिका घेणे टाळल्यास अधोगती अपरिहार्य राहील, एव्हढेच यानिमित्त म्हणता येईल. सारांशात, भाजपेयींना ‘यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है …’चा बिगुल ऐकवण्यास हरकत नाही.
Comments are closed.