NGN News
Latest Marathi News

नाशकात भाजपमधील वाद चव्हाट्यावर; एबी फॉर्मची पळवापळवी

  • इच्छुक उमेदवाराकडून शहराध्यक्षांच्या वाहनाचा पाठलाग

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये प्रचंड घडामोडी घडल्या. भाजपच्या तिकीट वाटपाचा वाद अक्षरशः रस्त्यावर आला. पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या वाहनाचा इच्छुक उमेदवाराकडून पाठलाग करण्यात आला. शहराध्यक्षांच्या ताफ्यात आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे हेसुद्धा होते. इच्छुक उमेदवार आपल्याला तिकीट मिळावे या मागणीसाठी थेट एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाडीचा पाठलाग केल्याने नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलेले जाणवले. मुंबई-आग्रा महामार्गावरील एका फार्म हाउसवर झालेल्या भाजपमधील वादाची शहरभर दिवसभर चर्चा होती.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील सहकारी पक्षांना डावलून भाजपने ‘एकला चलो’ भूमिका घेतली. पक्षातील निष्ठावंताना डावलले जात असल्याच्या भावनेने गेल्याच आठवड्यात मोठा वाद उफाळून आला होता. निवडणुकीसाठी ऐनवेळी वेगळ्याच उमेदवारांना तिकीटे दिली जात असल्याच्या भावनेने काही इच्छुक उमेदवारांकडून शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला.  केदार यांचे वाहन एका फार्महाउसवर आले तेव्हा अनेक इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते त्यांची वाट पाहत उभे होते. अनेक उमेदवारांनी जबरदस्ती फार्महाउसवर घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर बराच राडा पाहायला मिळाला. काही इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून दिलेल्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली. अनेकजणांनी फार्महाउसच्या दरवाज्यावर लाथा सुद्धा मारल्या. इच्छुक उमेदवार नवीन नाशिक आणि पंचवटी परिसरातील होते आणि एबी फॉर्म घेण्यासाठी ते पाठलाग करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

रिद्धीश निमसे भाजप उमेदवार

दरम्यान, कारागृहात असलेल्या भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव निमसे हे धोत्रे खून प्रकरणातील आरोपी असून सध्या ते कारागृहात आहेत. तथापि, संबंधित प्रभागातील पक्षीय बलाबल आणि राजकीय ताकद लक्षात घेऊन भाजपने रिद्धीश निमसे यांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर येत आहे.

Comments are closed.