भाजपचा दुसरा नेता गुन्ह्यात अडकल्याने शहरभर चर्चा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शहराच्या पंचवटीतील फुलेनगर भागात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या वादातून सागर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता आणि या प्रकरणात जगदीश पाटील यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये उपस्थित असतानाच ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गोळीबारामागील नेमके कारण आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात आधीच ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आता पाटील यांचा गोळीबार प्रकरणात नेमका कोणत्या कारणाने सहभाग राहिला, ही बाब लवकरच पोलीस तपासात उघड होणार आहे.
आधी निमसे, आता पाटील..
गेल्या आठवड्यात पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर जाधव नावाच्या तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात सागर गंभीर जखमी झाला होता. सागर जाधवला दोन गोळ्या लागल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी भाजपचे आणखी एक माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजपचा दुसरा नगरसेवक गोळीबार प्रकरणात अडकल्याने त्याची शहरभर चर्चा सुरु आहे.
Comments are closed.